कोल्हापूर : नगरसेवकपद रद्द करण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यामुळे महापौर अश्विनी रामाणे व महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम यांनी मंगळवारपासून नेहमीप्रमाणे कामकाजास प्रारंभ केला. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी जेव्हा महापालिकेच्या कार्यालयात प्रवेश केला, त्यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. जातीचे दाखले अवैध ठरल्यामुळे महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, संदीप नेजदार, दीपा मगदूम, सचिन पाटील, नीलेश देसाई व संतोष गायकवाड अशा सातजणांचे नगरसेवकपद रद्द करण्यात झाले होते. तथापि, या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सोमवारी (दि. १६) रात्री आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापौर रामाणे यांना खास अधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठवून ‘मंगळवारपासून आपण नियमित कामकाजात सहभागी होऊ शकता,’ असे कळविले. तसेच त्यांना महापौर म्हणून असलेल्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध करून दिल्या. सकाळी साडेअकरा वाजता महापौर अश्विनी रामाणे व महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम यांचे महापालिकेत आगमन झाले. त्यावेळी उपस्थित असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, उमा बनछोडे, सौ. कवाळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, रामचंद्र भोगम, दुर्वास कदम, आदी उपस्थित होते. महापौर कार्यालयाबाहेरील झाकून ठेवण्यात आलेला ‘अश्विनी रामाणे, महापौर’ या नावाचा फलक, त्याचबरोबर सात नगरसेवकांच्या झाकून ठेवण्यात आलेले फलक मंगळवारी खुले करण्यात आले. महापौर रामाणे यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात होणाऱ्या कार्यशाळेच्या पूर्वतयारीची बैठक घ्यायची होती; परंतु आयुक्त पी. शिवशंकर मुंबईला गेल्यामुळे तसेच अन्य प्रमुख अधिकारी पूर्वनियोजित बैठकीत व्यस्त असल्याने ही बैठक घेतली नाही. केएमसी कॉलेजमधील प्राध्यापकांच्या नेमणुकीसंदर्भात मात्र प्राचार्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्या आपल्या कार्यालयात होत्या. दरम्यान, नगरसेवकांवरील कारवाईला स्थागिती मिळाल्यामुळे नगरसेवक, त्यांचे समर्थक यांच्यात विशेष उत्साहाचे वातावरण होते. गेले आठ दिवस ज्या तणावाखाली सर्वजण वावरत होते, तो तणावही दूर झालेला दिसून आला. (प्रतिनिधी)
महापौरांची पुन्हा एंट्री
By admin | Published: May 17, 2016 11:57 PM