संतोष मिठारीकोल्हापूर : पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या (तंत्रनिकेतन पदविका) विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष, सत्रातील नापास (अनुत्तीर्ण) विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दि. २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या निर्णयामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणार आहे.‘पॉलिटेक्निक डिप्लोमा’च्या ३५ टक्के विद्यार्थ्यांचे ‘ईअर डाऊन’ या वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने दि. ६ ऑगस्टच्या अंकात विद्यार्थ्याकडून होणारी पुरवणी परीक्षेची मागणी आणि थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश देणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेशाबाबतची अडचण मांडली. त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेत पुनर्परीक्षेचा सकारात्मक निर्णय घेतला.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन परीक्षा झाल्याने लिखाण आणि अभ्यासाची सवय मोडल्याचा फटका यंदा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना बसला. सुमारे ३५ टक्के विद्यार्थी चार ते पाच विषयांमध्ये नापास झाले. त्यात अंतिम वर्षातील विद्यार्थीही होते. त्यांना परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार होती. मात्र, आता सप्टेंबरमध्ये परीक्षा होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होईल.‘डिग्री’चा १० टक्के कोटा थांबविणारदोन वर्षे ऑनलाईन परीक्षा झाली. त्यावेळी पॉलिटेक्निकचा ९० टक्के निकाल लागला. यावर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यावर ३७ टक्के निकाल लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांबाबतचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यावर डिसेंबरपर्यंत न थांबता सप्टेंबरमध्ये फेरपरीक्षा आणि कठीण विषयांचे जादा तास घेण्याचे नियोजन केले. त्यामुळे विद्यार्थ्याला या परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत होईल. पॉलिटेक्निकला डिप्लोमानंतर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी १० टक्के कोटा असतो. त्यातील प्रवेशाची प्रक्रिया पुनर्परीक्षेचा निकाल येईपर्यंत थांबविली जाणार आहे. द्वितीय वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिजकोर्स घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.या विद्यार्थ्यासाठी ‘रेमेडिअल कोचिंग’उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे या नापास विद्यार्थ्यांसाठी कठीण विषयाकरिता रेमेडिअल कोचिंग (उपचारात्मक अध्यापन प्रक्रिया) राबविली जाणार आहे. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स घेण्यात येणार आहे.
‘पॉलिटेक्निक’च्या तृतीय वर्षातील नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार, वर्ष वाचणार
By संताजी मिठारी | Published: August 25, 2022 6:38 PM