संदीप आडनाईक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यानंतरही स्वत:वर जबाबदारी न घेता त्याचे खापर विद्यार्थ्यांवर फोडत आयोगाने या चाचणीची फेरपरीक्षा बुधवारी (दि. ३१ मे) आयोजित केली आहे. आयोगाने सॉफ्टवेअरमध्ये, तसेच निकषातही कोणताही बदल न करता स्वत:वरची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच टाकलेली आहे.
आयोगाच्या दक्षता, धोरण व संशोधन विभागाच्या सहसचिवांनी २४ मे रोजी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरिता दि. ७ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची मुंबईत नव्याने ३१ मे रोजी सकाळी ८:३० ते ९ या वेळेत इंग्रजी माध्यमासाठी, तर ११ ते ११:३०, दुपारी १:३० ते २, दुपारी ४ ते ४:३० आणि सायंकाळी ६:३० ते ७ या वेळेत मराठी माध्यमासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. मात्र, ज्या कारणासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर आणि निकषात बदल केलेले नाहीत. मग ही परीक्षा पुन्हा कशासाठी घेत आहेत, असा सवाल उमेदवार विचारत आहेत.की-बोर्ड त्रुटी, मशीन ऑटो लॉक, वीज व्यत्यय, स्वयंचलितरीत्या चाचणीमधून बाहेर पडल्याच्या कोणत्याही त्रुटी आढळल्यास समवेक्षकाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास पुन्हा लॉगइन करण्याची मुभा दिली असली तरी ७ मार्चला झालेल्या त्रुटीनंतरही पुन्हा टंकलेखनाचा उतारा मर्यादा मराठीसाठी ३०० शब्द आणि इंग्रजीसाठी ४०० शब्दांचाच ठेवला आहे. यासाठी की-बोर्ड चाचणी, ब्रेक, मॉक, ब्रेक, मराठी टंकलेखन यासाठी ३२ मिनिटांचाच वेळ दिला आहे.सराव चाचणी घेण्याच्या सूचना मराठीसाठी की-बोर्ड ले-आउटही रेमिंग्टन मराठी आणि इंग्रजीसाठी इंग्रजी यूएस असा बोर्ड ठेवला आहे. यावेळी की-बोर्डमध्ये तांत्रिक बिघाड नसतानाही उमेदवाराने की-बोर्ड बदलून देण्याचा आग्रह धरल्यास कारवाई करण्याची धमकीही आयोगाने दिली आहे. यासाठी चाचणी सुरू होण्यापूर्वी सराव चाचणी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.