शिरोळ : स्व. ए. आर. पोळ यांचा चित्रकलेमध्ये हातखंडा होता. त्यांचीच कला पद्मजा पोळ हिने जोपासली आहे. या कलेच्या माध्यमातून देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पद्मजाने नाव मिळवावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी दिली.
येथील पद्मजा पोळ हिने तयार केलेल्या आकर्षक चित्रकृतींचे प्रदर्शन राजर्षी छ. शाहूनगर वाचन मंदिरामध्ये भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन तहसीलदार डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.
पद्मजा ही बॅचलर ऑफ फार्मसीमधील अंतिम वर्षात शिकत असून, लॉकडाऊन कालावधीत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग अभ्यासाबरोबरच वेगवेगळी पेंटिंग करण्यासाठी केला. जवळपास शंभर वेगवेगळी पेंटिंग तिने साकारलेली आहेत. उच्चकलेचे कोणतेही शिक्षण तिने घेतलेले नाही, तरीसुद्धा उत्कृष्ट अशी पेंटिंग तिने तयार केलेली आहेत.
याप्रसंगी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, वाचन मंदिराचे अध्यक्ष आनंदराव माने-देशमुख, धनाजीराव जाधव, एम. एस. माने, बजरंग काळे, रावसाहेब देसाई, संजय शिंदे, गजानन संकपाळ, विजयकुमार आरगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - २९१२२०२०-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथील नगरवाचन मंदिरात चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रावसाहेब देसाई, आनंदराव माने-देशमुख, एम. एस. माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.