कोल्हापूर : शहरात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी अशाच प्रकारे मोहीम राबविण्यात आली. यावेळी बहुतांशी वाहनधारकांनी नियमांचे पालन करत झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी न करता पाठीमागे केली. वाहनधारकांच्यात झालेल्या परिवर्तनामुळे पोलिस प्रशासनाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दिवसभरात हजार वाहनांवर कारवाई करून दोन लाख रुपये दंड वसूल केल्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह उपनगरांत वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यानुसार शहरात सोमवारी मोटार व्हेईकल अॅक्टनुसार परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनचालकांना जाग्यावर २०० ते १ हजार रुपये दंडाची पावती दिली गेली. दि. १७ व १८ एप्रिलला केलेल्या कारवाईची वाहनधारकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. बहुतांशी वाहनधारकांनी झेब्रा क्रॉसिंग पाठीमागे वाहने थांबवून नियमांचे पालन केले. या कारवाईमध्ये दीडशे पोलिसांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)पेठवडगावात २२ हजार दंड वसूलपेठवडगाव : शहरातील प्रमुख चौकात बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत १११ वाहनधारकांकडून सुमारे २२ हजार २०० रुपये दंड वसूल केला. सोमवारी आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर १५ पोलिसांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलला. त्यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले.
नियम मोडणाऱ्यांवर पुन्हा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 1:02 AM