कोल्हापूर : शिवसेनेबरोबर युती होईल की नाही, उमेद्वार कोण असेल, याविषयात अधिक काळ लक्ष न घालता पक्ष देईल, त्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. दि. २४ जानेवारीला कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर येणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताप्रीत्यर्थ विमानतळ ते अंबाबाई मंदिर अशी पाच हजार कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली काढण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील बुथप्रमुख, विस्तारक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांची आढावा बैठक सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पार पडली, त्यावेळी दानवे बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, मकरंद देशपांडे, रवी आनासपुरे, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते.भाजपचे मंडल अध्यक्ष, विस्तारक यांना रावसाहेब दानवे यांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून पक्षाने लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात केलेल्या तयारीची माहिती जाणून घेतली. दानवे यांच्यासह विजयराव पुराणिक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
लोकसभा मतदारसंघातील तयारी, तेथील सध्याची परिस्थिती, पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी, आदी संघटनात्मक बाबींवर अधिक चर्चा झाली. शेवटी दानवे यांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, आपल्याला नेमून दिलेले कार्य प्रामाणिकपणे पार पाडा, असे आवाहन केले.
अमित शहा २४ जानेवारीस कोल्हापुरातलोकसभेच्या कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा या चार मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक २४ जानेवारीला सांगली येथे होत आहे. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. या दिवशी सकाळी विशेष विमानाने अमित शहा कोल्हापूरला येणार आहेत.
यावेळी विमानतळ ते अंबाबाई मंदिर अशी दुचाकीची रॅली काढण्यात येईल. सुमारे पाच हजारांवर कार्यकर्ते या रॅलीत सहभागी व्हावेत, अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. प्रमुख कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत एक बैठक व स्नेहभोजन व पत्रकार परिषद, असे शहा यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम असल्याचे दानवे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात भाजप कार्यकर्ते, मंडल अध्यक्ष, विस्तारक यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी संदीप देसाई, महेश जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे, विजय पुराणिक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मकरंद देशपांडे, रवी आनासपुरे उपस्थित होते.