विश्वास पाटील ।कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारीची आॅफर दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध सुरू झाल्याने स्वत: महाडिक हेदेखील अस्वस्थ आहेत. त्यातून हा पर्याय पुढे आला आहे, परंतु त्यास स्वत: महाडिक यांची कितपत तयारी आहे, हा प्रश्नच आहे; कारण तिथे विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे असतील आणि भाजपवाले शेट्टी यांना पाडण्यासाठी ताकद पणाला लावत आहेत, असे चित्र तयार झाल्यास सामान्य माणूस शेट्टी यांच्या मागे ताकदीने उभा राहतो, असा इतिहास आहे; त्यामुळे खासदार महाडिक हे धाडस करण्याची शक्यता कमीच आहे.
भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही हे अजून नक्की नाही; परंतु ही युती होण्याचीच जास्त शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत व या दोन्हीही शिवसेनेकडे आहेत; कारण भाजपची ताकद मर्यादित होती तेव्हा शिवसेनेने या जागा लढवल्या, परंतु त्यांना आतापर्यंत एकदाही यश मिळालेले नाही. त्यातही शिवसेनेचे कोल्हापूरच्या जागेबाबत भावनिक बंध आहेत, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा करायचा हे स्वप्न होते. ते अजून पूर्णत्वास गेलेले नाही. गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही जागांवर दावा सांगितला असला, तरी त्यांनाही कोल्हापूरची जागा मिळणार नाही हे माहीत आहे. मिळालीच तर हातकणंगलेची जागा मिळू शकते, असा त्यांचाही होरा आहे.
खासदार महाडिक यांना काम करणारा खासदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आले असले, तरी निवडणूक तीन महिन्यांवर आली तरी पक्ष एका बाजूला व ते दुसऱ्या बाजूला अशी दरी निर्माण झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा महाडिक यांच्यावर विश्वास आहे, परंतु संघटना आपल्याला निवडणुकीत त्रास देईल, अशी भीती खासदारांना वाटते; त्यामुळे त्यांनीही अजून पर्यायांचा शोध बंद केलेला नाही. त्यांच्यादृष्टीने कोल्हापुरातूनच युतीतील भाजप किंवा शिवसेनेची उमेदवारी सुरक्षित आहे; परंतु शिवसेनेतून या जागेवरून प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी नक्की मानली जाते. युती झाली, तर जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे स्पष्टच आहे; त्यामुळे भाजपने कोल्हापूरची जागा आपल्याकडे घ्यावी, असे महाडिक यांना वाटते; परंतु ते या घडीला तरी शक्य नाही.
पालकमंत्री पाटील व खासदार महाडिक यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. मंत्री पाटील यांच्या मार्गावरूनच जाणे मला आवडते, असे वक्तव्य त्यांनी गेल्याच आठवड्यात केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाडिक यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा पर्याय दिला आहे. सध्या या मतदारसंघातून भाजपकडून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठी धैर्यशील माने यांच्याही भेटीगाठी सुरू आहेत. शिवसेनेकडे तूर्त या मतदारसंघातून ताकदीचा उमेदवार नाही.
या मतदारसंघात सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे आहेत. इचलकरंजी व शिराळा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. फक्त वाळवा मतदारसंघच राष्ट्रवादीकडे आहे. महाडिक गटाचे वाळवा व शिराळा मतदारसंघात काही पॉकेट आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वत: माजी आमदार महादेवराव महाडिक हे खासदार शेट्टी यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करत आहेत. संघटनेतील वादाला त्यांच्याकडूनच फूस दिली जात असल्याची स्वाभिमानीची तक्रार आहे. राज्यस्तरीय राजकारणात खासदार शेट्टी हे भाजपच्या विरोधात पाय रोवून आक्रमकपणे उभे राहिल्याने त्यांचा पराभव करणे हा भाजपच्या दृष्टीनेही महत्त्वाचा अजेंडा आहे.ज्ञानेश्वर मुळे यांची राजू शेट्टी यांच्याशी चर्चाहातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टी यांच्या विरोधात ज्यांचे नाव चर्चेत आहे, ते परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी कोल्हापूर दौºयात शिरोळला शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व लोकसभा निवडणूक व राजकारण प्रवेश याबाबत चर्चा केली. कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्याने तिथे मंडलिक यांची उमेदवारी नक्की आहे; त्यामुळे तुम्हाला खरेच रस असेल, तर राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न करू शकता, अशी चर्चा या बैठकीत झाली. त्यांनी मात्र आपल्याला सांगली मतदारसंघातून जास्त रस असल्याचे मत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुळे हे परराष्ट्र सेवेतून फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत व लगेच मार्चमध्ये लोकसभा निवडणुका आहेत; त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत काही राजकीय निर्णय घेण्यात त्यांना अडचणी येत आहेत; परंतु आपल्याला सार्वजनिक जीवनात काम करायला आवडेल, असे त्यांनी सांगितले असल्याने त्यांच्यापुढे राजकीय पर्याय आहे.