कोल्हापूर : जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आठ मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांमध्ये भाजपच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युतीमध्ये जिल्ह्यात विसंवाद असल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे. यातील तीन मतदारसंघांमध्ये तर भाजपच्या नेत्यांनी ‘जनसुराज्य’ची उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात बंडाळी माजली असून, त्यांचीच आता कसोटी लागणार आहे.
चंदगडमध्ये एकीकडे शिवसेनेचे संग्राम कुपेकर युतीचे अधिकृत उमेदवार असताना आजरा कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘जनसुराज्य’कडून अर्ज दाखल केला आहे. यातील हेमंत कोलेकर, भरमूअण्णा पाटील, रमेश रेडेकर, गोपाळराव पाटील या सगळ्यांंनीच अर्ज भरून ठेवले आहेत. कागलमध्ये तर समरजितसिंह घाटगे यांनी ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. राधानगरीमध्ये भाजपच्या राहुल देसाई यांनी अर्ज दाखल केला असून, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवविण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप नगरसेविकेचे पती आणि ज्यांचा भाऊही भाजप नगरसेवक आहे असे चंद्र्रकांत जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात थेट कॉँग्रेसचा हात हातात घेतला आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री या तर भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार होत्या. हातकणंगले येथून भाजपकडून जनसुराज्यमध्ये गेलेले अशोकराव माने यांनी उमेदवारी ठेवली असून त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.शिरोळमधील भाजप नेते अनिल यादव यांनीही जनसुराज्यची उमेदवारी घेतली आहे. हे सर्व पाहता युतीमध्ये संवादापेक्षा विसंवादच अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्णातून कोणीही बंडखोरी करणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. मात्र त्यासाठी त्यांचीच आता कसोटी लागणार आहे.
शिवसेनेच्या काही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठीही भाजपचे पदाधिकारी अनुपस्थित राहिले याचीची चर्चा आता मतदारसंघांमध्ये सुरू आहे. दुसरीकडे, राजेश क्षीरसागर यांचा प्रचार करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तयार नसल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक बोलवावी लागली आहे.
‘जनसुराज्य’ आला धावूनज्या-ज्या ठिकाणी भाजपला अडचण आली, त्या-त्या ठिकाणी ‘जनसुराज्य’ने आपली उमेदवारी या इच्छुकांना दिल्याने भाजपचाच हा ‘बी प्लॅन’ असल्याची जोरदार चर्चा असून, आता यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील काय निर्णय घेणार, याकडे जिल्ह्णाचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेनेचा प्रचार करण्यास भाजपचा नकारकोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांचे काम करण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाने आज, शनिवारी सकाळी ११ वाजता भाजप कार्यालयात बैठक बोलावली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.