कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात निर्माण झालेल्या राजकीय स्पर्धेतून त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली. त्याचा आनंद मंगळवारी कसबा बावडा परिसरात व्यक्त झाला. त्यासंबंधीच्या पोस्ट सोशल मीडियावरही शेअर झाल्या. ही नियती आहे, दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्यांच्या घरातसुद्धा आगडोंब उसळू शकतो, अशी टिप्पणी त्यामध्ये करण्यात आली होती.शरद पवार यांनी माजी राज्यपाल व काँग्रेसचे नेते डॉ. डी. वाय. पाटील यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. डॉ. पाटील यांनी पवार हे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. तो धागा पकडून पवार यांनी त्यांना थेट पक्षातच घेतले. ही गोष्ट डॉ. पाटील यांच्या कुटुंबियांना आवडली नाही. त्यातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक हे डी. वाय. पाटील यांचे छायाचित्र जाहिरातीत वापरत आहेत.
डी. वाय. पाटील यांचा आशीर्वाद असल्याने मला बावड्यातून मताधिक्य मिळण्यात अडचण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत; त्यामुळे वडील एका पक्षात व मुलगा त्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात, असे चित्र पुढे आले आहे. सतेज पाटील अधिक त्वेषाने महाडिक यांच्या प्रचारात उतरण्यामागे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे; त्यामुळेच पवार घराण्यात बंडाळी उमटल्यावर त्याविरोधात बावड्यात प्रतिक्रिया उमटली.