लोकमत न्यूज नेटवर्क
लोकमत प्रतिनिधी : देश रक्षणासाठी जवानांनी दिलेले बलिदान, केलेला त्याग याची जाणीव आपण सर्वांनी ठेवून अमर जवानांच्या कुटुंबीयांबद्दल आत्मीयता बाळगली पाहिजे, वीरपत्नी सुवर्णा संभाजी पाटील यांनी उभारलेली स्वागत कमान सैन्यात जाणाऱ्या तरुणांच्या पुढे आदर्श ठरेल, असे प्रतिपादन १०९ टी. बटालियनचे सुभेदार आकाराम मोरे यांनी व्यवत्त केले. पेरीड, ता. शाहूवाडी येथे अमर जवान संभाजी लक्ष्मण पाटील यांच्या नावाने उभारलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त डीवायएसपी बाजीराव पाटील होते.
बाजीराव पाटील म्हणाले, आपल्या पतीच्या नावाने उभारलेली स्वागत कमान वीरपत्नीसाठी नवा आदर्श घालून दिला आहे. अमर जवानाच्या नावाने गावच्या वेशीवर असणारी स्वागत कमान गावचे सौंदर्य वाढविणार आहे. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील, विजय पाटील, सदानंद आग्रे, सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत कमानीचे उद्घाटन नायब तहसीलदार विलास कोळी, सुभेदार आकाराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. वीरपत्नी सुवर्णा संभाजी पाटील यांचा सत्कार ज्योत्स्ना बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पेरीड ग्रामस्थांच्या वतीने वीरपत्नीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी सभापती सुभाषराव इनामदार, माजी उपसभापती विष्णू पाटील, महादेव पाटील, पो. नि. विजय पाटील, मेजर श्रावण यादव, सुभेदार पांडुरंग कोकाटे, सरपंच संजय पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर. रंगराव पाटील, प्राचार्य सुनील होळकर, माजी पंचायत समिती सदस्य वंदना पाटील, आबाजी पाटील, आदींसह ग्रामस्थ, सेवनिवृत्त जवान, वीरपत्नी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.