भारत चव्हाण
कोल्हापूर : महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळा प्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलेल्या तक्रारी नुसार झालेल्या चौकशीत आणखी सात कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर प्रशासकिय कारवाईची शिफार चौकशी समितीने केली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतू शेटे यांनी जाहीर आरोप केलेल्या कर निर्धारक संजय भोसले यांच्यावर मात्र कोणताच ठपका ठेवण्यात आलेला नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तत्कालिन कर संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना घरफाळा विभागातील घोटाळ्यास जबाबदार धरुन त्यांना निलंबित करण्यात आले तसेच त्यांच्यावर पोलिसात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या चारही अधिकाऱ्यांना जामिन मिळू नये म्हणून न्यायालयात नगरसेवक प्रा. जयंत पाटील सुनावणीवेळी म्हणणे मांडल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले.त्यानंतर नगरसेवक भूपाल शेटे यांनी या प्रकरणात उडी घेत विद्यमान कर निर्धारक संजय भोसले यांच्यावर बेछुट आरोप करीत भोसले सुध्दा दोषी असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच चौकशी समितीकडे काही कागदपत्रे दिली होती. त्यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शेटे यांच्या तक्रारींची चौकशी करुन चौकशी अहवाल देण्याची जबाबदारी चौकशी समितीवर टाकली होती.पाच प्रकरणात संजय भोसले जबाबदार असल्याचे तसेच संगणकात फेरफार करुन २ कोटी ८७ लाख रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असल्याचा आरोप शेटे यांनी केला होता. अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखा परीक्षक धनंजय आंधळे, लेखापाल संजय सरनाईक यांनी याबाबत चौकशी केली.
त्याचा अहवाल आयुक्त कलशेट्टी यांना देऊन आता पंधरा वीस दिवस होऊन गेले आहेत. अद्याप आयुक्तांनी तो जाहीर केलेला नाही, उलट योग्य त्या कार्यवाहीसाठी म्हणून सहायक आयुक्त विनायक औधकर यांच्याकडे पाठविला आहे.संजय भोसले यांना क्लिनचिट?चौकशी समितीने आयुक्तांना दिलेल्या अहवालात सात कर्मचाऱ्यांचे युजर आयडी नमूद करण्यात आले असून सदरचे युजर आयडी वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे तसेच त्याद्वारे झालेल्या व्यवहारास तेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
त्यामध्ये सात जणाव्यतिरीक्त संजय भोसले यांच्यावर मात्र कोणताच ठपका नाही असे सांगण्यात येते. चौकशी समितीने भोसले यांना क्लिनचिट दिली की त्यांचा या प्रकरणात खरोखरच सहभाग नव्हता याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.अनेक कंगोरे, अनेकांच्या अंगलटघरफाळा घोटाळ्यात घडत असलेल्या घडामोडींना अनेक कंगोरे आहेत. दिवावकर कारंडे यांनी निर्माण केलेले शत्रु, त्यांच्या कामाची पध्दत, संजय भोसले यांचा कर्मचारी संघातील अचानक झालेला प्रवेश आणि प्रशासनातील वाढत चाललेले वर्चस्व, प्रा. जयंत पाटील यांनी न्यायालयात मांडलेली बाजू, भूपाल शेटे यांनी केलेले आरोप आणि या सगळ्या प्रकरणात प्रा. पाटील व शेटे यांना माहिती पुरविणारी यंत्रणा अशा अनेक पातळीवर हे प्रकरण पेटले आहे. परंतु यात अनेक जण अडचणीत येत आहेत. एक वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाने आपापसात बसून हा विषय मिटवा अन्यथा तुम्हा अधिकाऱ्यांचेच नुकसान होईल असा सल्ला दिला होता.