लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पूर्वनियोजित साप्ताहिक सभा असतानाही आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासमवेत फिरतीस गेलेल्या दोन अधिकाऱ्यांची शुक्रवारी स्थायी समिती सभेत चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. अधिकारी येत नाहीत तोपर्यंत सभाच चालू करणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर दोन अधिकारी सभागृहात आले खरे पण त्यांना सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यापुढे जबाबदार अधिकारी सभेस आले नाहीत तर सभा घेतली जाणार नाही, असा इशारा सभाध्यक्ष संदीप नेजदार यांनी दिला. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली; परंतु जबाबदार अधिकारी नसल्याने ही सभा उशिराने सुरू झाली. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाल्याने त्यांनी गुरुवारीच कार्यभार सोडला. दुसरे उपायुक्त विजय खोराटे रजेवर होते तर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर आयुक्त चौधरी यांच्यासमवेत फिरतीस गेले होते. त्यामुळे सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागची सभा अधिकारी नसल्यामुळे त्यांचा निषेध करून तहकुब करण्यात आली होती. यावेळी तरी अधिकारी उपस्थित राहतील अशी अपेक्षा असताना चित्र उलटेच होते. सभेस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे पगार कापण्यात यावेत, अशी सूचना जयश्री चव्हाण यांनी केली. जोपर्यंत जबाबदार अधिकारी सभागृहात येत नाहीत तोपर्यंत कामकाज होणार नाही, अशी भूमिका सभापती नेजदार यांनी घेतली. त्यामुळे आयुक्तांसोबत फिरतीवर असलेल्या अधिकाऱ्यांना निरोप धाडण्यात आले. दुपारी पावणेदोन वाजता शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व आरोग्याधिकारी अरुण परितेकर सभागृहात आले. त्यांचे आगमन होताच सदस्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. सभा असताना तुम्ही फिरती कशी काय आयोजित केली, अशा शब्दांत सभापतींनी अधिकाऱ्यांना झापले. यापुढे असे घडले तर सभा घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलण्याकरीता डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामावर मनपा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे ते सदोष होत आहे. कन्सल्टंटने खुदाई करून टेस्टिंग केलेले नाही,जागेवरील पाहणी केलेली नाही. कार्यालयात बसून डीपीआर केला जात आहे. मग त्यांना अडीच कोटी रुपये फी कशासाठी द्यायची, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी सभेत केली. त्यावेळी जलअभियंता यांनी कामावर लक्ष ठेवावे. जर कन्सल्टंटचे काम व्यवस्थित नसेल तर आयुक्तांना तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी दिले. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत मनिषा कुंभार, उमा इंगळे, आशिष ढवळे, जयश्री चव्हाण, कविता माने, रिना कांबळे आदींनी भाग घेतला. ‘नेचर इन निड’कडे ८० लाखांची थकबाकीजैववैद्यकीय कचरा गोळा करण्याचा ठेका ‘नेचर इन निड’ला देण्यात आला असून त्यांच्याकडे ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांत जागेचे भाडे भरलेले नाही. शहरातील डॉक्टर्सकडून नियमबाह्ण वसुली सुरू आहे म्हणूनच त्यांच्याकडील वसुली तातडीने करण्यात यावी अथवा त्यांचे प्रक्रिया केंद्र सील करावे, अशी मागणी नीलोफर आजरेकर व सत्यजित कदम यांनी केली. त्यावेळी जैववैद्यकीय कचरा उचलणे बंद झाले तर महापालिकेवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोटीस देऊन त्यांच्याकडून वसुली केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘स्थायी’त अधिकाऱ्यांची कानउघाडणी
By admin | Published: June 03, 2017 12:48 AM