कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यातील मुदत संपलेल्या २४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या लोकसंख्येनुसार नव्याने प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरू करण्याच्या विनंतीचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी आयुक्तांना दिले. यामुळे पुन्हा नव्याने प्रभागरचनेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नव्या वर्षातच निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. नव्याने काढलेल्या आदेशात एका प्रभागात किती नगरसेवक असणार, प्रभागरचनेचे निकष काय असतील, याबद्दल मात्र स्पष्टता नाही.महापालिका निवडणुकीच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० संपली. कोरानामुळे निवडणूक झाली नाही. प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे काम पाहत आहेत. कोरोना कमी झाल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यानुसार एक सदस्य प्रभागरचना प्रसिध्द करून आरक्षण काढण्यात आले. मतदार यादीही अंतिम करण्यात आली. मात्र मार्च २०२१ मध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश आले.महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑक्टोबर २०२१ मध्ये त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार महापालिकेची प्रभागरचना करण्यात आली. तत्कालीन शासनाच्या आदेशानुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली. ८१ वरून ९२ नगरसेवक निश्चित करून ३१ प्रभाग तयार करून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आरक्षणही काढण्यात आले. अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली. निवडणुकीचा प्रत्यक्षातील कार्यक्रम जाहीर होणार होता.दरम्यान, महाविकास आघाडी सरकार गेले. नवे सरकार आले. पुन्हा नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच ८१ करण्यात आली. त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. आता मंंगळवारी काढण्यात आलेल्या पत्रानुसार पुन्हा नव्याने प्रभागरचना होणार आहे. यानुसार प्रारूप प्रभागरचना, त्यावर हरकती, त्यावर सुनावणी घेऊन अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या सर्व प्रक्रियेला किमान चार ते पाच महिने लागणार असल्याचा अंदाज महापालिका निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ही प्रक्रिया रद्दशहरातील ३१ प्रभागांतील ९२ सदस्यांनुसार आरक्षण काढण्यात आले होते. यानुसार १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, २२ ओबीसी आणि ५७ सर्वसाधारण असे आरक्षण पडले होते. मात्र नव्या प्रभागरचनेच्या आदेशानुसार आरक्षणही बदलणार आहे.
चौथ्यांदा श्रीगणेशायापूर्वी महापालिका निवडणुकीची तीनवेळा निवडणूक प्रक्रिया प्रशासनाने मोठ्या कष्टाने राबवली. मात्र विविध कारणांनी प्रत्यक्ष निवडणूक झाली नाही. निवडणूक प्रक्रिया रद्द झाली. आता चौथ्यांदा निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनास निवडणूक प्रक्रियेचा श्रीगणेशा करावा लागणार आहे. ओबीसी आरक्षणामुळेही ही प्रक्रिया एकदा रद्द झाली.
निवडणुकीचा खेळखंडोबा; इच्छुकांची घालमेलमहापालिका निवडणुकीची प्रक्रिया थांबविल्याने इच्छुक निवडणूक तयारीपासून दूर गेले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू, रद्द अशा खेळखंडोबामुळे इच्छुकांमध्ये घालमेल तयार झाली आहे. निवडणूक प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार असल्याने त्यांना तयारी करावी लागणार आहे.
दोन वर्षे प्रशासकराजमहापालिकेची मुदत १५ नोव्हेंबर २०२०ला संपल्याने तेव्हापासून सलग दोन वर्षे महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. खरे तर या काळात नगरसेवकांचा हस्तक्षेप नसल्याने प्रशासनाने अधिक चांगले काम करून दाखवण्यास संधी होती. प्रत्यक्षात अनुभव तसा नाही. अडचणीत आलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासकांनी रुळावर आणली. तेव्हा सभासदांनीच वार्षिक सभेत बँकेवर कायमच प्रशासक असावेत, अशी जाहीर मागणी केली होती; परंतु महापालिकेच्या प्रशासक काळात तशी चांगल्या कामाची पुनरावृत्ती झाली नाही.