संदीप आडनाईककोल्हापूर : ‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपने आयोजित केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेत सोमवारी ६५ प्रजातींच्या ५२५ पक्ष्यांची नोंद केली गेली. यातील ९ प्रजाती या स्थलांतरित पक्ष्यांच्या आहेत. जिल्ह्यातून ३५ पेक्षा जास्त पक्षीनिरीक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.‘बर्डस आॅफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपमार्फत कोल्हापूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागांत पक्षिगणना करण्यास प्रारंभ झाला आहे. या पक्षिगणनेतून जमा झालेली माहिती ‘वेटलाँड इंटरनॅशनल’ या पर्यावरणीय संघटनेच्या ‘इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस’मध्ये जमा करण्यात येणार आहे.कोल्हापुरात दर सोमवारी विविध परिसरात ही पक्षिगणना होणार आहे. पुढील गणना रविवार, दि. ५ जानेवारी २०२० रोजी रंकाळा तलावावरती केली जाणार आहे, अशी माहिती या ग्रुपचे समन्वयक प्रणव देसाई आणि सतपाल गंगलमाले यांनी दिली.या पक्षिगणनेमध्ये कोल्हापूर शहराबरोबरच गडहिंग्लज, राधानगरी येथून आलेल्या पक्षिनिरीक्षकांनी आपला सहभाग नोंदविला. हळदी-कुंकू बदक, साधी तुतारी, छोटा-कंठेरी चिलखा, टिटवी, छोटा पाणकावळा, लांब शेपटीचा खाटिक, मध्यम बगळा यांच्याबरोबरच अन्नसाखळीच्या टोकाला असणारे कैकर, युरेशियन दलदल हरीण, गरुड या शिकारी पक्ष्यांचीही नोंद कळंबा तलावावरती झाली.
कळंब्यावरती अशा अन्नसाखळीच्या टोकाला असणाऱ्या पक्ष्यांची उपस्थिती असणं, हे तलाव जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असल्याची साक्ष देणारे असल्याचे मत या गणनेचे समन्वयक प्रणव देसाई यांनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी सुहास वायंगनकर यांनी मार्गदर्शन केले. स्वप्निल पवार, फारुख म्हेतर, आशिष कांबळे, कृतार्थ मिरजकर या तज्ज्ञ पक्षिनिरीक्षकांनी या गणनेत सहभाग घेतला.