संदीप आडनाईककोल्हापूर : येथील जिज्ञासा विकास मंदिर या विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेने बौद्धिक अक्षम मुलांसाठी (मतिमंद) विकसित केलेला विशेष अभ्यासक्रम राज्यभरातील विशेष मुलांच्या शाळेत प्रायोगिक प्रकल्प म्हणून राज्य सरकार राबविणार आहे. या शाळेला ‘मॉडेल स्कूल’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.कमी वयोगटातील बौद्धिक अक्षम मुलांसाठी जिज्ञासा विकास मंंदिर आणि प्रौढ विशेष मुलांसाठी राही पुनर्वसन केंद्र ही कार्यशाळा येथील क्रशर चौकात सुरू आहे. गेली ३० वर्षे या शाळा सुरू आहेत. १९९२ पासून कोटीतीर्थ येथे सुरू असलेली ही शाळा गेल्या पाच वर्षांपासून आता क्रशर चौकातील रघुनंदन हॉल येथे भाड्याच्या जागेत सुरू आहे.जिज्ञासा विकास मंदिरात ६ ते १८ वयोगटातील ७५ आणि राही पुनर्वसन केंद्रातील कार्यशाळेत ७५ विद्यार्थी शिकत आहेत. रजपूतवाडी, पीरवाडी, लक्षतीर्थ, शिये, शिरोली, शिंगणापूर, कळंबा, खुपिरे या परिसरातून हे विद्यार्थी या शाळेत रोज येतात. मुख्याध्यापक विशाल दीक्षित यांच्यासह पाच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह २२ शिक्षक या संस्थेत काम करतात. संस्थेतून बाहेर पडलेली २० विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत स्वतंत्रपणे काम करत आहेत, हे विशेष.आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण११ ते ५ या वेळेत या शाळेत या विशेष विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण दिले जाते. एका जागेतून दुसरीकडे प्रवास करणे, जागा ओळखणे, फोनचा वापर करणे, वैद्यकीय जाणिवा ओळखणे असे शिक्षण दिले जाते. विशेष अभ्यासक्रमातील या विचाराची दखल घेत राज्य सरकारने त्याचाही अपंग संहितेत समावेश केला आहे. मुलांना क्षमतेनुसार आणि वयोगटानुसार संस्थापक स्मिता दीक्षित यांनी हा अभ्यासक्रम विकसित केला आहे.विविध प्रकल्पांची योजनाडॉ. न. स. कुलकर्णी उर्फ शामराव दूधगावकर आणि कमल दुधगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मिता कुलकर्णी-दीक्षित यांनी शामकमल चॅरिटेबल ट्रस्टमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही संस्था सुरू केली. यातून विविध प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. जागेसोबत वैद्यकीय मदतनीस, क्रीडा प्रशिक्षकांची संस्थेला गरज आहे.
कोल्हापुरातील ‘जिज्ञासा’च्या मतिमंद मुलांसाठीच्या विशेष अभ्यासक्रमाची नोंद, ‘मॉडेल स्कूल’ म्हणून मिळाली मान्यता
By संदीप आडनाईक | Published: July 19, 2023 4:45 PM