दत्तवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील शेतकरी संजय सुरेश पाटील यांनी ५० गुंठे क्षेत्रात व १४४.५० टन इतके उसाचे भरघोस उत्पन्न घेऊन आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेती किफायतशीर ठरते हे दाखवून दिले आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या प्रात्यक्षिक प्लॉट अंतर्गत या शेतकऱ्यास शेती विभागाने मार्गदर्शन केले होते. आडसाली लागवड करताना को-८६०३२ या जातीच्या ऊस बियाण्याची निवड केली होती.
जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सहा फूट अंतर असलेल्या सऱ्यांमध्ये दीड फूट अंतराने उसाची रोपे लावली होती. यासाठी चांगल्या बियाण्याची निवड करून उसाची रोपे घरीच तयार करण्यात आलेली होती. लागवडीची मात्रा देताना रासायनिक व सेंद्रीय खताचा वापर करण्यात आलेला होता. त्याचबरोबर जिवाणूंचा वापर करण्यात आलेला आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्याने पिकास योग्य तेवढेच पाणी मिळाले आहे. याचबरोबर उसाची रोपे लावल्यानंतर आळवणी, फवारणीदेखील घेण्यात आलेल्या आहेत. ऊस तोडणीवेळी एका उसाचे वजन सुमारे साडेचार किलो इतके भरले असून उसाच्या कांड्या जवळजवळ ४५ पेक्षाही जास्त आहेत. उसाची लांबी सुमारे २८.०८ फूट झाली आहे. यासाठी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगन्ना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील, अमित माने, सुनील कदम, अजित मटाले यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - १११२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील संजय पाटील यांच्या शेतातील ऊस पीक दाखविताना दत्त कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी.