लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) महालक्ष्मी पशुखाद्य विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात (२०२०-२१) तब्बल २५ लाख पोत्यांची विक्री गोकुळने केली आहे. गुणवत्तेच्या बळावर खासगी कंपन्यांच्या पशुखाद्य उत्पादनांना टक्कर दिली आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. लॉकडाऊनच्या काळातही इतर यंत्रणेत अडथळे निर्माण झाले, मात्र ‘ पशुखाद्य दूध उत्पादकांपर्यंत व्यवस्थित पोहचले. मागील आर्थिक वर्षात २५ लाख पोत्यांची विक्री संघाने केली आहे.
संघाच्या गडमुडशिंगी व कागल औद्योगिक वसाहत या दोन ठिकाणी महालक्ष्मी पशुखाद्य उत्पादित केले जाते, त्याबरोबर जनावरांना त्यांच्या शरीर पोषणाबरोबर दूध वाढीसाठी कारखान्यामध्ये टी. एम. आर. ब्लॉक, फर्टिमिन प्लस, सिल्वर रेशन पॅलेट व लहान वासरांसाठी मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर व फिडिंग पॅकेज उत्पादित केले जाते. या सर्व उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी संघाने ‘आयएसओ’बरोबर ‘बीआयएस’ स्टँडर्डसाठी नोदंणी केली असून, यापुढे चांगल्या गुणवत्तेचे पशुखाद्य दूध उत्पादकांना उपलब्ध होईल, असे महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचे व्यवस्थापक डॉ. व्ही. डी. पाटील यांनी सांगितले.
कोट-
‘गोकुळ’ आणि ‘गुणवत्ता’ हे समीकरण ग्राहकांच्या मनात पक्के आहे. त्यामुळे दूध असो अथवा पशुखाद्य दोन्हीला अधिक मागणी आहे. यामध्ये दूध उत्पादकांसह, कर्मचारी, वितरण व्यवस्था यांचे योगदान आहे.
- रवींद्र आपटे (अध्यक्ष, गोकुळ) (फोटो-१४०४२०२१-कोल-रवींद्र आपटे)