लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मुलकीपड जमिनीचे वाटप करून शेतकऱ्यांच्या सातबारा पत्रकी नावे नोंद केली जाणार असल्याचे प्रतिपादन शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी केले.
करंजपेण येथे आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. करंजपेण येथे दहा गावांतील शेतकरी जमा झाले होते. महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी यांनी जे शेतकरी मुलकीपड जमीन कसत आहेत, अशा शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांना तातडीने जमिनीचा सर्व्हे करून सातबारा पत्रकी त्यांची नोंद केली जाणार आहे.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. दिवसभर महसूल विभागाचे कामकाज सुरू होते. प्रत्येक आठवड्यात तीन गावांतील शेतकऱ्यांची बैठक घेऊन मुलकीपड जमिनीचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे मंडल अधिकारी राजेंद्र सुतार यांनी सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार गुरु बिराजदार, मंडल अधिकारी राजेंद्र सुतार, तलाठी सागर जगताप, मारुती पाटील, मुलकी पड संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा कदम, तेजश्री कुंभार, पांडुरंग कांबळे, माजी पंचायत सदस्य मनोहर कांबळे, दगडू गुरव, तुळशीराम बेनकर, लक्ष्मण कांबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.