कोल्हापूर : संस्थेच्या घटनेनुसार कोणत्याही कारणाने संचालक निवृत्त झाल्यास संचालकपद रद्द होते, असा नियम असतानाही गेल्या दीड वर्षांपासून संचालक पदावर नियमबाह्यरित्या त्या पदाचा लाभ घेणाऱ्या संचालकांकडून सर्व भत्ते सव्याज वसूल करावे, अशी मागणी ‘कोजिमाशी’चे संचालक समीर घोरपडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
कोजिमाशीचे एक संचालक मे महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यांना तरीही सभेला बसू दिले जाते. सर्व भत्तेही त्यांनी घेतले आहेत. ही बाब नियमबाह्य असून, याबाबतचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेशही त्यांनी यावेळी सादर केला. लाखो रुपयांची ऑडिट फी ऐनवेळेच्या विषयात मंजूर झाली. नेहमीच्या मर्जीतील कंपनीला लाखो रुपयांची एएमसी दिली. दीपावली भेटीतही साशंकता आहे. लेखापरीक्षण हे वीस मिनिटांच्या सभेत घेतले. व्याजदराचा विषयही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंजूर केल्याचे विविध आरोप घोरपडे यांनी या पत्रकार परिषदेत केले. यावेळी शहाजी पाटील, संजय जाधव, अंजली जाधव, संजय पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय जाधव, बी. के. मोरे, विनोद उत्तेकर, रंगराव तोरस्कर, अनिल इंगळे, डी. पी. सुतार, सागर सुतार आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
संस्थेचा कारभार सभासद हिताचा व पारदर्शी आहे. आटापिटा करूनही चेअरमनपद मिळाले नाही. त्यामुळे आता निवडणुकांवर डोळा ठेवून आरोप होत आहेत. हे आरोप करणाऱ्यांनी निवडणुकीला सामोरे जावे.
- कैलास सुतार, अध्यक्ष, कोजिमाशी