कोल्हापूर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या खासगी आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २३ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कऱ्हाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्यांचा चार हजार ८०० रुपये दंड भरून घेतला. मंगळवारी सकाळी महापालिका माळकर सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.कोल्हापूर, इचलकरंजी शहरात वाहतूक दंड भरून घेण्यासाठी ‘ई’ चलन मशीनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलीस मशीनद्वारे काढत आहेत.
वाहनचालकाने केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसते. ही रक्कम वाहनधारकाकडून ए टी एम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरून घेतली जात आहे. एखाद्या व्यक्तीने देशभरात कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, याची कुंडली या मशीनमध्ये पाहायला मिळते. अशाच प्रकारे मंगळवारी सकाळी खासगी आराम बस (एम. एच. ०४ जी. पी. २३५६) अंबाबाई दर्शनासाठी भाविक-पर्यटकांना घेऊन कोल्हापुरात आली.चालक नायकवडी याने बस थेट शिवाजी चौक माळकर सिग्नल चौकात नेली. बस रस्त्यावर आल्याने वाहनांची प्रचंड कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या बसचा नंबर मशीनवर सर्च केला असता, आतापर्यंत त्याने २३ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एकूण २४ गुन्ह्यांचा त्याच्याकडून दंड वसूल करून घेतला.आठ लाख ३६ हजार दंडाची वसुलीशहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०३६ वाहनधारकांवर महिन्याभरात कारवाई करून आठ लाख ३६ हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. तसेच सहा महिन्यांंमध्ये १७६३ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयास पाठविला आहे. शहरातील वाहतूक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १६००७ वाहनधारकांवर कारवाई केली.