ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १२ - केंद्र शासनाचा मोठ्या रक्कमेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय महावितरण कंपनीच्याही चांगलाच पथ्यावर पडला आहे. महावितरणला शुक्रवारी एका दिवसांत सर्व प्रकारच्या बिलापोटी तब्बल ८ कोटी २४ लाख रुपये रोख जमा झाले. शनिवारीही दिवसभर लोकांची बिले भरण्याची झुंबड होती. परंतू किती रक्कम जमा झाली हे समजू शकले नाही.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महावितरणची सर्व बिले भरणा केंद्र आज रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत तर सोमवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकृत सुत्रांनी दिली.
महावितरणचे कोल्हापूरात परिमंडळ कार्यालय आहे. त्याअंतर्गत घरगुती,औद्योगिक, वाणिज्य व कृषी अशा चारही प्रकारचे कोल्हापूर जिल्ह्यांत १० लाख तर सांगली जिल्ह्यांत ८ लाख ग्राहक आहेत. त्यांतील अनेक ग्राहक ऑनलाईन बिल भरतात परंतू त्यांचा या रक्कमेत हिशोब नाही. महावितरणकडे एका दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यांत सुमारे दोन कोटी रुपये बिलापोटी जमा होतात. त्याच्या तिप्पट रक्कम प्रत्यक्षात शुक्रवारी जमा झाली. सांगलीत ८० लाख रुपये जमा होतात हा आकडा सव्वा दोन कोटींवर पोहचला आहे.
महावितरणने वीज बिल वसूलीसाठी कित्येक मोहिमा राबवल्या तरी आजपर्यंत इतक्या मोठया प्रमाणावर आणि ती देखील एकाच दिवसांत एवढया रक्कमेची कधीच वसूली झालेली नाही. त्यामुळे या निर्णयाचा सामान्य जनतेला रांगेत उभा राहून त्रास होत असला तरी शासकीय निमशासकीय यंत्रणांना मात्र चांगला फायदा होवू लागला आहे. ही वसूली अशीच झाली तर पुढच्या दोन दिवसांत महावितरणचे परिमंडळात कोणी थकबाकीदारच राहणार नाहीत.