लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नेट-सेट न झालेले, परंतु सध्या सेवेत असलेल्या प्राध्यापकांना वेतनवाढीसह अन्य अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारमधील मुख्य कणा असलेल्या मंत्र्यांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून प्राध्यापकांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे पैसे गोळा केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. पैसे गोळा करण्याच्या तक्रारीस दुजोरा देऊन शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) ने अशापध्दतीने कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन प्राध्यापकांना केले आहे.
जे प्राध्यापक २४ ऑक्टोबर १९९२ ते ३ एप्रिल २००० पर्यंत रितसह नियुक्त झाले आहेत, त्यातील काहींचे नेटसेट झाले आहे, काही फक्त पदव्युत्तर आहेत, काहींचे एम. फिल्., तर काहींची पीएच.डी. झाली आहे. त्यांना नित्याचे वेतन मिळते; परंतु पहिल्या तारखेपासून सेवा मोजून पदोन्नती मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या पेन्शनचेही प्रश्न आहेत, त्यातील काहींनी सर्वोच्य न्यायालयापर्यंत जाऊन ही पेन्शन मिळविली आहे. पदोन्नतीपासून व अन्य अनुषंगिक लाभ होत नाहीत. यातील अनेक प्राध्यापक आता निवृत्त झाले आहेत व काही निवृत्तीच्या वाटेवर आहेत. अशा प्राध्यापकांना हे आर्थिक लाभ मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर प्रस्ताव करण्याचे काम सुरू आहे. त्याची शिक्षण सहसंचालकांच्या पातळीवर माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शासनाने त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. त्याचा आधार घेऊन ही पैसे गोळा करण्याची मोहीम सुुरू आहे. राज्यभरात असा लाभ होऊ शकणारे किमान २ हजार, तर काहीअंशी लाभ मिळणारे ३ हजार प्राध्यापक आहेत. त्यामुळे आकारली जाणारी रक्कम याचा एकत्रित विचार केल्यास ही रक्कम फारच मोठी होऊ शकते. ज्या मंत्र्यांचे नाव यामध्ये पुढे केले जात आहे, त्यांचा या प्रकाराशी दुरान्वयेही संबंध नाही, परंतु त्यांच्या नावावर पावती फाडून काही मध्यस्थच हे पैसे गोळा करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच सुटाने २३ डिसेंबरला त्यासंबंधीचे लेखी निवेदन काढून असे पैसे कुणालाही देऊ नयेत, असे आवाहन केले आहे.
नेट-सेट प्रश्नाबाबत काही हितसंबंधी व्यक्तीकडून जीआर काढून आणतो म्हणून पैसे मागितले जात आहेत, अशी सुटाची खात्रीलायक माहिती आहे. अशा पध्दतीने कोणी पैसे मागत असल्यास किंवा गोळा करत असल्यास त्याची माहिती तातडीने आम्हाला द्यावी.
डॉ. डी. एन. पाटील,
प्रमुख कार्यवाह, सुटा संघटना, कोल्हापूर