कोल्हापूर : राज्यातील महाविद्यालयांतील ग्रंथपालपदांबाबत दि.११ ऑगस्टपर्यंत शासनाने भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासन निर्णय काढावा; अन्यथा दि.१२ ऑगस्टपासून नांदेडसह राज्यातील दहा उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्य ग्रंथपाल महासंघाने मंगळवारी दिला. त्याबाबतचे निवेदन महासंघाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक एच.एन. कठरे यांना दिले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दि.२७ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आठ दिवसांत पदभरतीचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना झाला, तरी अद्याप त्यावर कसलीच कार्यवाही झालेली नाही. शासनाला जोपर्यंत पात्रताधारक आत्महत्या करणार नाहीत, तोपर्यंत जाग येणार नसेल, तर मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री आणि वित्तमंत्री यांनी आम्हाला आत्महत्येची रीतसर परवानगी देण्याची मागणी राज्यातील पात्रताधारकांनी या निवेदनाद्वारे केली. महासंघाच्या शिष्टमंडळात अनिल सावरे, शुभदा माने, नीता पाटील, डॉ. जे.यू. मुल्ला, महेश केसरकर, वैभव जाधव, सुशांत स्वामी, श्रीकांत भोसले यांचा समावेश होता.
महासंघाच्या मागण्या
१) अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथापालांची पदभरती सुरू करावी.
२) ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे. अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी.
३) खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथापालांची नियुक्ती विद्यापीठ नियमांना अधीन राहून वेतनश्रेणीनुसार करावी.
फोटो (२७०७२०२१-कोल-ग्रंथपाल महासंघ) : कोल्हापुरात मंगळवारी राज्य ग्रंथपाल महासंघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक एच.एन. कठरे यांना दिले.
270721\27kol_3_27072021_5.jpg
फोटो (२७०७२०२१-कोल-ग्रंथपाल महासंघ) : कोल्हापुरात मंगळवारी राज्य ग्रंथपाल महासंघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक एच. एन. कठरे यांना दिले.