कोल्हापूर : वर्षभराच्या बेगमीची लाल चटणी करण्यासाठी घराघरांत लगबग सुरू आहे. मिरची खरेदीसाठी लक्ष्मीपुरीत महिलांची झुंबड उडाली आहे. लालभडक दर्जेदार मिरची १०० ते १५० रुपये दराने मिळत आहे. चटणीसाठी मागणी वाढल्याने लसूण, आले, कोथिंबिरीचे दरही या वर्षभरात पहिल्यांदाच वाढले आहेत. लसूण ६० रुपये, तर आले १२० रुपये किलो झाले आहे.उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसत आहे. दुपारच्या वेळी बाजार ओस पडू लागला असून, विक्रेतेही सावलीचा आधार घेत आहेत. कडक ऊन असले तरी मिरची लाईनमध्ये मात्र खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी चटणीसाठी लागणाऱ्या मिरचीचे दर फारच कमी झाले आहेत. एक नंबरची मिरची १५० रुपयांना प्रतिकिलो मिळत आहे.
संकेश्वरी मिरचीचे दर ४०० रुपयांवरच असले तरी उर्वरित काश्मिरी ब्याडगी, साधी ब्याडगी, हैदराबादी मिरचीचा दर १२० ते १५० रुपये आहे. गुंटूर १०० ते १३० रुपये, लवंगी १०० ते १३० असे सर्वसाधारण दर आहेत. चटणीसाठी लागणारा लसूण व आल्याचा दर वाढला आहे. २० ते २५ रुपये किलो असणारा दर आता ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. आलेही ३० रुपये पाव किलो झाले आहे. पाच रुपयांना मिळणारी कोथिंबीर १५ रुपयांवर पोहोचली आहे.
कलिंगडांचे दर कमी, लिंबूच्या दरात वाढउन्हाचा तडाखा वाढल्याने काकडी, कलिंगड, अननसांची बाजारात रेलचेल वाढली असून त्यांचे दरही कमी झाले आहे. काळ्या पाठीचे कलिंगड १० ते २० रुपये, तर हिरव्या पट्ट्यांचे कलिंगड ४० ते ८० रुपये असा दर आहे. काकडीचे दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोवर टिकून आहेत. लिंबूची मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे.
उच्च प्रतीचा लिंबू पाच रुपयांना एक, तर कमी प्रतीचे दोन रुपयांना एक याप्रमाणे विक्री होत आहे. नीलम आंब्याचे आगमन झाले असून डझनाचा दर शंभर रुपये आहे. कर्नाटक हापूस बाजारात दिसत आहे; पण ४०० ते ६०० रुपये डझन दर असल्याने त्याला म्हणावे तसे गिºहाईक दिसत नाही.
हिरव्या मिरचीचा भडकाचटणीसाठीच्या लाल मिरचीचे दर ९० ते १०० रुपयांपर्यंत गडगडले असताना हिरव्या मिरचीचे दर मात्र वाढले आहेत. ३० ते ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची ८० रुपयांवर पोहोचली आहे. बाजारातही हिरव्या मिरच्यांची आवक कमी झाल्याचे दिसत आहे. आता उन्हाळी मिरचीचा हंगाम सुरू झाल्यानंतर आवक वाढून दरात घट होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.पालेभाज्या कडाडल्याकडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पालेभाजी व फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. मेथीची जुडी १५ रुपये, कांदेपात, शेपू, अंबाडा १० ते १५ रुपये असे दर आहेत. वांग्याचे दर स्थिर आहेत. ढबू मिरची, गवारी, दोडका ८० रुपये किलो आहे. कोबी, फ्लॉवरचाही दर २० ते ४० रुपये झाला आहे.