कोल्हापूर : अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमुळे शहरात रेडिमिक्स काँक्रिटची वाहने रात्री दहानंतर आणावी लागत आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी रात्री काँक्रिट टाकणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची अडचण होत असून या वाहनांबाबत सवलत देण्यात यावी, अशी मागणी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव आणि माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी येथे केली.क्रिडाई कोल्हापूर या संस्थेतर्फे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ‘दालन’ या गृहप्रदर्शनाच्या मंडप उभारणी कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परीख, ‘दालन’चे चेअरमन सचिन ओसवाल, समन्वयक संजय चव्हाण, आदी उपस्थित होते.
अध्यक्ष यादव म्हणाले, पोलीस प्रशासनाने शहरात केलेल्या दिवसा अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीला आमचा पाठिंबा आहे. मात्र, रेडिमिक्स क्राँकिटच्या वाहनांना प्रवेशबंदी केल्याने बांधकाम करताना अडचणीचे ठरत आहे. रात्रीच्यावेळी क्राँकिट टाकण्याचे काम करताना आवाज होत असल्याने परिसरातील लोकांना ते त्रासदायक ठरत आहे.
आमचे प्रकल्प सुरू असताना येणारे रेडिमिक्स क्राँकिटचे वाहन रस्त्यावर थांबत नाही. ते बांधकाम सुरू असलेल्या परिसरातच थांबते. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. या वाहनांना शहरात दिवसा प्रवेशासाठी सवलत देण्याची मागणी क्रिडाई कोल्हापूरच्यावतीने पोलीस अधीक्षकांना करणार आहे.
माजी अध्यक्ष पाटील म्हणाले, बांधकामाच्या ठिकाणी रेडिमिक्स काँक्रिटची प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. हे क्राँकिट घेऊन येणाऱ्या वाहनांना मुंबई, पुणे येथे दिवसा प्रवेश दिला जातो. त्याच धर्तीवर कोल्हापूरमध्ये देखील या वाहनांना प्रवेश देणे आवश्यक आहे.
भाडेतत्त्वावरील मिळकतींचा घरफाळा कमी व्हावामहानगरपालिकेने भाडेतत्त्वावरील मिळकतींचा घरफाळा कमी करावा. कोल्हापूर शहरातील हा घरफाळा देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे अनेक खासगी कंपन्या या ठिकाणी येण्यास आणि बँका या विस्तार करणे टाळत आहेत. एकूणच त्याचा शहराच्या विकासाला फटका बसत आहे. त्याचा विचार करून महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये याबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष यादव यांनी केली.
त्यावर नगरसेवक रत्नेश शिरोळकर म्हणाले, सन २०११ पासून महानगरपालिकेने घरफाळा वाढविलेला नाही. निवासी मिळकतींचा घरफाळा देशात कमी आहे. भाडेतत्त्वावरील मिळकतींचा घरफाळा कमी करण्याबाबत मध्यम मार्ग काढावा लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.