लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. मात्र, आतापर्यंत दिलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या आकलनातील मर्यादा, अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसलेले वर्ग, बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरूप यामुळे विद्यार्थी, पालकांची घालमेल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचा अभ्यासक्रम आणखी २५ टक्क्यांनी कमी करावा. प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी कमी करण्याचा विचार राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने गांभीर्यपूर्वक करावा. त्यादृष्टीने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जूनपासून दहावी, बारावीचे ऑनलाईन, तर दोन महिन्यांपासून ऑफलाईन वर्ग सुरू झाले आहेत. दर महिन्याच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत ऑनलाईन पध्दतीने ७० टक्के, तर ऑफलाईन स्वरूपात २० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मोबाईल, नेटवर्कची उपलब्धता या तांत्रिक तसेच अन्य अडचणींमुळे सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे आकलन बहुतांश विद्यार्थ्यांना समजलेले नाही. प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मागणीनुसार पुन्हा पहिल्यापासून अभ्यासक्रम अनेक शाळांनी सुरू केला आहे. कोरोनामुळे शिक्षण विभागाने गेल्या पाच महिन्यांपूर्वी इयत्ता पहिली ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाबाबतची सद्यस्थिती आणि अडीच महिन्यांवर आलेली परीक्षा लक्षात घेता, दहावी, बारावीचा अभ्यासक्रम आणखी २५ टक्क्यांनी कमी करावा. प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी घटवावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांची आहे.
प्रतिक्रिया...
ऑनलाईन शिक्षण अपेक्षित प्रमाणात परिणामकारक झाले नसल्याचे चित्र आहे. अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण झाला, तरी तो विद्यार्थ्यांना कितपत समजेल याबाबत शंका आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी यंदा थोडी कमी करण्याबाबत विचार व्हावा.
- बी. एच. शिंदे, पालक, सम्राटनगर.
गेल्या सात महिन्यांपासून आमचे ऑनलाईन वर्ग सुरू असले, तरी विविध अडचणींमुळे सर्वच विद्यार्थी या वर्गांना उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम आणखी कमी करावा. गणित, विज्ञानमधील काठिण्यपातळी अधिक असलेले प्रश्न कमी करण्याचा विचार व्हावा.
- ऋग्वेद कराळे, विद्यार्थी, दहावी.
ऑनलाईन शिक्षण घेण्यात काही मर्यादा होत्या. आता प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने अभ्यासक्रमांतील काही संकल्पना समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी कमी झाल्यास ते आम्हा विद्यार्थ्यांसाठी हितकारक ठरणार आहे.
- साक्षी डोईफोडे, विद्यार्थिनी, बारावी.
परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या, तरी अद्याप कोणता २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, त्याबाबतची स्पष्टता शासनाकडून मिळालेली नाही. ही माहिती लवकर शाळा, शिक्षकांना मिळणे आवश्यक आहे.
- राजेश वरक, माध्यमिक शिक्षक
चौकट
आतापर्यंत अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी आतापर्यंत कोल्हापूर विभागामधील एकूण २,४४,२०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यात दहावीचे १,२६,६३४, तर बारावीचे १,१७,५६८ विद्यार्थी आहेत. अर्ज करण्याची मुदत २८ जानेवारीपर्यंत आहे.