लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ताराबाई पार्क व न्यू शाहुपूरी येथील मिळकतींवरील ब सत्ताप्रकार कमी करून या सर्व्हे नंबरचा क सत्ताप्रकारात समावेश करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील बऱ्याच सिटी सर्व्हे नंबरवरील ब सत्ताप्रकार नोंदी कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आमच्या अर्जांचाही त्यासाठी विचार व्हावा, अशी अपेक्षा या नागरिकांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की, तारााबई पार्क ई वॉर्ड येथील २२१ ते २६३ यामधील १८ मिळकती व न्यू शाहूपुरी येथील २०४ या सिटी सर्व्हे नंबरवर ब सत्ताप्रकार झाला आहे. त्यामुळे येथील मिळकतींचा विकास थांबला आहे. फ्लॅटची विक्री, कर्ज, नवीन बांधकाम, वारसा हक्क नोंदणी ही कामे ठप्प झाली आहेत. वरील सर्व्हे नंबरमधील काही लोकांनी वैयक्तिकरीत्या आपल्या मिळकतीवरील ब सत्ता प्रकार कमी करून तो कमध्ये वर्ग करून घेतले आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी कागदपत्रे क्लिष्ट असून वेळेत मिळत नाहीत. हा परिसर क्षेत्रफळाने मोठा आहे. त्यामुळे संयुक्तरीत्या त्यावरील ब सत्ता प्रकार नोंद कमी करून क सत्ता प्रकार करावी. यावेळी दीपाली घाटगे, संजय घाटगे, राजेश घाटगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
--
फोटो नं ११०१२०२१-कोल-बी टेन्युअर निवेदन
ओळ : कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे या परिसरातील मिळकतींवरील ब सत्ता प्रकार कमी करण्याची मागणी केली.
--