उचगाव : लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून उचगावमधील कोरोना रुग्णसंख्येचा दर कमी करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनाला दिल्या. बलकवडे यांनी उचगावला भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, सरपंच मालूताई काळे, ग्रामविकास अधिकारी अजित राणे उपस्थित होते. उचगावमध्ये एकूण १०७६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. येथील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक बनली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उचगावकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टिकोनातून स्वतः प्रभारी जिल्हाधिकारी यांनी उचगावला भेट दिली व सद्यस्थितीचा आढावा घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या, ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत तो भाग कंटेनमेंट झोन करून तेथे प्रवेशबंदी करण्याच्या सूचनाही बलकवडे यांनी केल्या. बलकवडे यांनी सुरुवातीला उचगाव भाजी मार्केटची पाहणी केली. तसेच उचगाव कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी व तेथील डॉक्टरांशी संवाद साधला.
फोटो : ०६ उचगाव बनकवडे भेट
प्र. जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी उचगावला भेट देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.