जयसिंगपूर : डिझेल दरवाढ कमी करावी, अशी मागणी शिरोळ तालुका मोटारमालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री अनिल परब, पालकमंत्री सतेज पाटील, परिवहन आयुक्तांना दिले आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव राजेंद्र दाइंगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
वर्षभरात सातत्याने डिझेल इंधन दरात अवास्तव वाढ होत आहे. त्याचबरोबर पेट्रोलचेही भाव भयानक वाढले आहेत. या इंधन दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोना महामारीत वाहतूकदारांचे काम सुरूच होते. अशा परिस्थितीतही वाहतूकदार सरकारी टॅक्स, वाहतूक कर, पर्यावरण कर, व्यवसाय कर, जीएसटी, सीएसटी, अशा अनेक करांचा भरणा करून वाहने रस्त्यावर परवाने फी भरूनच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूलही यापासून शासनाला मिळत आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने वाहतूक व्यवसाय सुस्थितीत आणण्यासाठी इंधन दरवाढीत कपात करण्यासाठी निर्णय घेऊन वाहतूक व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष सिकंदर गैबान, उपाध्यक्ष हिरालाल पटेल यांची स्वाक्षरी आहे.