कोल्हापूर : डिझेलचे दर कमी झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रति किमी ३९ रु. दराने प्रासंगिक करारावर सौंदत्ती यात्रेला जाण्यासाठी गाडी द्यावी, अशी मागणी आज रविवारी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्यावतीने सौंदत्ती यात्रेच्या आढावा बैठकीत करण्यात आली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आनंदराव पाटील होते. पाटील म्हणाले, डिझेल दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ४२ रु. कि.मी दर करण्यात आल्याचे सांगितले आहे. या दरवाढीमुळे यंदा सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या प्रत्येक भक्तांना किमान २.६० पैसे अधिक बोजा पडणार आहे. अलीकडच्या काळात दोन वेळेस डिझेल दर कमी झाले आहेत. त्यामुळे वाढीव दर कमी करून गतवर्षीप्रमाणेच ते ३९ रुपये ठेवावेत, अशी मागणी आम्ही कोल्हापूरचे विभाग नियंत्रक सुहास जाधव यांच्याकडे केली आहे. त्यांनी विशेष बाब म्हणून दर कमी करावेत याबाबत आमचा त्यांच्याशी पाठपुरवा सुरू आहे. उपाध्यक्ष मोहनराव साळोखे म्हणाले, सौंदत्ती यात्रेला जाण्यासाठी रेणुका भक्त नेहमी एसटीला प्राध्यान्य देतात. त्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळानेसुद्धा सौंदत्ती यात्रेकरूसाठी विशेष बाब म्हणून सवलत दिली पाहिजे. सुभाष जाधव म्हणाले, कर्नाटक गाडीचा किलोमीटरचा दर ३७ रुपये असला, तरी दिवसा ३५० किलोमीटर गाडी फिरलीच पाहिजे असा त्यांचा नियम आहे. गाडी जरी थांबून राहिली तर ३५० किलोमीटरप्रमाणेच पैसे आकारले जातात. त्यामुळे ज्यांना फिरत जायचे आहे, त्यांना ही गाडी परवडते. तसेच एस. टी महामंडळाने सौंदत्ती यात्रेसाठी गाडीसाठी अनामत रक्कम गाडी जमा केल्यानंतर तत्काळ परत द्यावी. एखादी गाडीमध्ये रस्त्यावर बिघाड झाल्यास तत्काळ दुसरी गाड्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. तसेच चालकाला वाहतुकीचे नियम सक्तीने पाळण्याबाबत आगार प्रमुखांना सक्त सूचना द्याव्यात. यावेळी कार्याध्यक्ष गजानन विभूते, सरचिटणीस अच्युत साळोखे, युवराज मोळे, खजानिस आनंदराव पाटील, सदस्य अशोक जाधव, धनाजी पवळ, विलास कुराडे, दयानंद घबाडे, सुनील जाधव, केशव माने, तनाजी बोरचाटे, अजित पाटील, रमेश बनसोडे, विजया डावरे, श्रीमती शालिनी सरनाईक, राणी मोगले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सौंदत्तीसाठी एसटीचे दर कमी करा
By admin | Published: November 17, 2014 12:17 AM