कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत कपात करण्यात आली आहे. भाविकांना आता सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी तीन ते रात्री आठ यावेळेत दर्शन घेता येईल. याशिवाय अभिषेकाची सुविधा बंद करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बुधवारी मंदिराच्या गरुड मंडपात श्रीपूजक, पोलीस व सुरक्षा यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पूर्वीप्रमाणे अंबाबाईच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी तीन ते रात्री आठ अशी करण्यात आली आहे. दुपारी बारा ते तीन यावेळेत मंदिर पूर्णत: बंद राहील. तसेच भाविकांसाठी सुरु करण्यात आलेली ई-पास सुविधा व भाविकांकडून करण्यात येणारे अभिषेकसारखे धार्मिक विधी बंद करण्यात आले आहेत.
भाविकांनी मंदिरात येताना मास्क वापरणे बंधनकारक असून, विनामास्क आढळल्यास दोनशे रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
---