सातारा : चारभिंती परिसरात सोमवारी तोतया पोलीस असल्याचे सांगून लुटालुटीचा प्रयत्न आणि मारहाणीची घटना घडल्यानंतर तोतया पोलिसांना ओळखायचे कसे, हा प्रश्न ऐरणीवर आला असून, यासंदर्भात पोलीस मॅन्युअलमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.साध्या वेशातील कोणतीही व्यक्ती आपण पोलीस असल्याचे सांगून धाकात घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्या व्यक्तीकडे अत्यंत नम्रपणे ओळखपत्र दाखविण्याची विनंती करावी, असे अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. पोलीस नियमावलीनुसार, साध्या वेशातील पोलिसाला नागरिकांनी विनंती केल्यास ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे, असे सूत्रांनी सांगितले.पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रामुख्याने आडबाजूला अशा घटना वारंवार घडताना दिसतात. एकान्त शोधणारी युगुले आणि वयोवृद्ध नागरिक, विशेषत: ज्येष्ठ महिलांना तोतया पोलिसांचे अनुभव अधिक येतात. शहरातही भररस्त्यात ‘पुढे चोर आहेत,’ असे सांगून तोतये ज्येष्ठ महिलांना त्यांचे दागिने रुमालात बांधून ठेवायला सांगतात आणि नंतर हातोहात लांबवितात, अशा घटना बऱ्याच वेळा जिल्ह्यात घडल्या आहेत. एकान्तासाठी शहराच्या आसपास फिरणाऱ्या प्रेमी युगुलांना धाक दाखवून लुटण्याचे प्रकारही वारंवार घडतात. त्यातील अनेक लुटारू आपण पोलीस असल्याचे सांगतात. अशा व्यक्तींना ओळखपत्र दाखविण्याची विनंती केल्यास, समोरची व्यक्ती खरोखर पोलीस आहे की नाही, याचा उलगडा होऊ शकतो.ओळखपत्र दाखवू न शकणारी व्यक्ती पोलीस नाही, हे लक्षात आल्यावर स्वसंरक्षणासाठी योग्य पवित्रे परिस्थितीचा अंदाज घेऊन संबंधितांना घेता येतात. कारण दरडावणारी व्यक्ती पोलीस नसल्यास ती परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जबरदस्ती, मारहाण, धक्काबुक्की करून लूट करू शकते. त्यामुळे शक्यतो आडबाजूला फिरायला न जाणे, हाच योग्य पर्याय ठरतो, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)‘तो’ निलंबित पोलीस असू शकतोकाही वेळा विशिष्ट कारणामुळे कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात येते. चौकशी सुरू असेपर्यंत ते निलंबित असतात. या काळात त्यांना अर्धा पगार मिळतो. असे कर्मचारीही काही ठिकाणी आपला पोलिसी रुबाब दाखवून अडचणीत सापडलेल्या व्यक्तींकडून पैसे उकळण्याची शक्यता असते. अशा घटना प्रामुख्याने विदर्भात घडल्या असून, आपल्याकडेही काही घटना घडल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
अदबीने मागा ओळखपत्र!
By admin | Published: December 29, 2015 11:18 PM