कोल्हापूर : आंघोळीचे पाणी एकत्रितपणे साठवून ते फरशी पुसण्यासह बाथरुमसाठी पुनर्रवापर करण्याचा उपक्रम महालक्ष्मी नगरमधील चौगुले कुटुंबीय राबवित आहेत. त्यासह जेवल्यानंतर झाडांच्या कुंड्यांमध्ये हात धुणे, आठवड्यातून एकदा जेवणासाठी ताटाऐवजी पत्रावळीचा वापर करणे याद्वारे पाणी बचत करीत आहेत.या उपक्रमाबाबत ‘निसर्ग मित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सांगितले की, माझ्या कुटुुंबामध्ये अकरा सदस्य आहेत. दुष्काळी स्थितीमुळे पाणी बचतीचा केवळ कोरडा संदेश न देता कृतीतून लोकांचे प्रबोधन करावयाचे असे आम्ही ठरविले. त्यात घरात आंघोळ, भांडी धुणे, आदी स्वरूपांतील दैनंदिन वापरातील पाण्याचा पुनर्रवापर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रत्येकाने १८ लिटर पाणी असणाऱ्या एका बादलीमध्ये आंघोळ करण्याचा आम्ही अलिखित नियम केला. शिवाय आंघोळीचे पाणी एका टबामध्ये साठविले जाते. याद्वारे आम्ही प्रतिमाणसी १५ लिटर पाण्याची बचत करतो. हे पाणी बाथरूमसह घरातील फरशी पुसणे, अंगणात सडा मारणे यासाठी करतो. त्यासह घराच्या परिसरात लावलेल्या कुंड्यांमधील झाडांना पाणी देण्यासाठी आम्ही ‘कुंड दत्तक’ उपक्रम राबविला आहे. त्यात आम्ही प्रत्येकजण जेवल्यानंतर एका कुंडीमध्ये हात धुतो. त्यातून हात धुतल्यानंतरचे पाणी वाया जात नाही. ते झाडांना मिळते. त्यासह आठवड्यातून एकदा ताट धुण्याच्या पाण्याची बचत व्हावी यासाठी जेवणासाठी पळसाच्या पानांच्या पत्रावळीचा वापर करतो. या सर्व उपक्रमांतून आम्ही दिवसाकाठी सुमारे दोनशे लिटर पाण्याची बचत करीत आहोत. (प्रतिनिधी) पाणी बचत महत्त्वाचीपाण्याबाबत स्वयंपूर्ण असलेल्या कोल्हापूरला सध्या पाणीटंचाई भासत आहे. भविष्यात या टंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी प्रत्येकाने पाण्याची बचत करणे महत्त्वाचे असल्याचे अनिल चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येकाने गरजे इतके आणि कमीत कमी पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. पाणी बचतीबाबत निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. त्यात एक लिटरमध्ये दुचाकी धुणे, आंघोळीच्या पाण्याचा पुनर्रवापर करणे, आदींचा समावेश आहे. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून सहजतेने पाणी बचत करणे शक्य आहे.
आंघोळीच्या पाण्याचा पुनर्रवापर
By admin | Published: May 18, 2016 11:19 PM