कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीचे पत्रे खराब झाले आहेत. दानशूर व्यक्तीने तीन लाखांचे पत्रे दिले आहेत. मात्र, महापालिकेने हे घेण्यास नकार दिला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा विरोध होत असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक संघटनांमध्ये यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.पंचगंगा स्मशानभूमीतील पत्रे खराब झाले आहेत. पावसाचे पाणी थेट बेडवर पडत आहे. याची माहिती शहरातील एका दानशूर व्यक्तीला समजली. त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून तीन लाखांचे पत्रे महापालिकेला दिले; परंतु महापालिकेने ते स्वीकरण्यास नकार दिला आहे. याची माहिती सामाजिक संघटना, परिसरातील तालीम संस्थांना लागली असून त्यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना याबाबत निवेदन दिले आहे.दबावाखाली येऊ नका, पत्रे तत्काळ बसवा : दिलीप देसाईलोकांनी महानगरपालिकेला कोणतीही वस्तू मदत म्हणून दिली तर याबाबत कुठल्याही प्रकारे अवमान होत नाही. नागरिकांनी यापूर्वी विविध वस्तू स्मशानभूमीसाठी दान केल्या आहेत. त्यामुळे निव्वळ पत्र्यांसाठी वेगळा विचार नसावा, ही अपेक्षा आहे. धार्मिक भावना न दुखावता, कोणत्याही दबावाखाली निर्णय प्रलंबित न ठेवता तत्काळ पत्रे बसवण्याचे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले.
पंचगंगा स्मशानभूमीला शेणी, दानपेटी, कव्हर शेड नागरिकांनीच दिली आहेत. सध्याच्या स्मशानभूमीतील शेडचे कामही एका उद्योजकानेच केले आहे. असे असताना पत्रे घेण्यास नकार दिला जातो, हे चुकीचे आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. मदत देणाऱ्यांच्या आडवे पडू नये.- धनंजय सावंत, अध्यक्ष, संयुक्त जुना बुधवार पेठ