कोल्हापूर : करवीर पोलीस ठाण्यामधील सात पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा न करता मोबाईल शॉपीमधील साहित्य हस्तगत करून परत न देणे, ते परत देण्यासाठी हजारो रुपयांची लाच मागणे, अशा गंभीर आरोपांची चौकशी करून कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याचे समजते; परंतु या आदेशाची प्रत आपल्याला अद्याप मिळालेली नाही. प्रत मिळताच मी स्वत: याप्रकरणी फेरचौकशी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. जुना बुधवार पेठ येथील तौसिफ खलील शेख या तरुणाची कॉम्प्युटर व मोबाईल शॉपी आहे. त्याने येथील पोलिसांनी जप्त केलेल्या व्यवसायाच्या साहित्याची मागणी त्यांच्याकडे केली; परंतु हे साहित्य पोलिसांनी परत दिले नाही. त्यामुळे त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात पोलिसांच्या विरोधात रिट अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार डॉ. शर्मा यांनी आदेशाची प्रत मिळताच चौकशी केली जाईल, असे सांगितले. या प्रकरणामध्ये पोलीस शिपायांमध्ये विजय गुरखे, सागर कांडगावे, बबलू शिंदे, संजय पडवळ, बाबूराव घोरपडे, प्रशांत घोलप, प्रथमेश पाटील, कुमार पोतदार यांचा समावेश आहे. या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस क्षेत्रात खळबळ माजली आहे. नेहमी ‘करवीर’च्या डीबी विभागातील कर्मचारी पोलीस ठाण्यामध्ये बसून असतात. शनिवारी मात्र ते दिवसभर इकडे फिरकलेच नाहीत. (प्रतिनिधी)
न्यायालयाची प्रत मिळताच चौकशी
By admin | Published: February 15, 2015 12:40 AM