ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ - निवडणूक कोणतीही असली तरी मतदानाचा अमूल्य अधिकार असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. भारतीय राज्य घटनेत प्रत्येक घटकाचा अत्यंत सुक्ष्म विचार केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानात अत्यंत सूत्रबध्दता असल्याने कुठलाही गोंधळ नसतो, कुठलीही संदिग्धता नसते असे सांगून त्यांनी सांगितले.
तसेच घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. अधिकार उपभोगत असतानाच कर्तव्यात कसूर करु नये, असेही ते म्हणाले. भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार लोकशाहीचा गाभा असून कुठलीही निवडणूक असो आपल्या या अमूल्य मताचा अधिकार बजावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महापौर हसिना फरास, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजेस्वीनी सावंत, लंडन विद्यापीठाचे प्राध्यापक ॲड्रेन मेहर, विभागीय कृषि सहसंचालक नारायण शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक एम.बी.तांबडे व हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पथक जाहिर झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी विविध विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यामध्ये निर्भया पथकाचा चित्ररथ यावर्षीचे आर्कषण ठरला. यामध्ये मोबाईल फॉरेन्सीक इन्वीस्टीगेशन विभागाचे वाहन, महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचा चित्ररथ, दंगल नियंत्रण पथक वाहन, कॅशलेस इंडियाचा बँक ऑफ इंडियाचा चित्ररथ, आरोग्य, आपत्ती व धोके व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण व वन विभाग, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, एडस् नियंत्रण, केंद्रांच्या विविध योजना, शिक्षण विभागाचा ज्ञानरथ, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी, विविध शाळांच्या लक्षवेधी चित्ररथांचा समावेश होता.