कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी करताना कोल्हापूरातील फुलेवाडी आणि यड्राव फाटा (ता. हातकणंगले) येथे दोन कारमध्ये सुमारे बारा लाख किंमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा मिळून आला. याप्रकरणी संशयित जीवन दादासो पाटील (वय ४२, रा. शाहुमिल कॉलनी, राजारामपूरी), शुभम आनंदा कोगे (२०, रा. राजारामपूरी ८ वी गल्ली), शिवानंद धोंडीराम कुंभार (३०), शब्बीर मेहबुब फरास (२७) यांना अटक केली. त्यांच्या दोन्ही कार जप्त केल्या.
लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत जिल्ह्यात मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. निवडणुक प्रशासन आणि पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर फुलेवाडी येथे पेट्रोलिंग करीत असताना पोपटी रंगाचा ओमनी कार (एम. एच. ०१ वाय ६९४) ची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे ७५० मि. ली. चे विदेशी मद्याचे सात बॉक्स मिळून आले. संशयित जिवन पाटील व शुभम कोगे हे दोघेजण मिळून आले.
दरम्यान कोल्हापूर-सांगली रोडवरील यड्राव फाटा (ता. हातकणंगले) येथे स्थिर निरीक्षण पथक वाहनांची तपासणी करीत असताना कार (एम. एच. ०९ बी. बी. १४४) मध्ये ९ लाख किंमतीचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला. याप्रकरणी संशयित शिवानंद कुंभार, शब्बीर फरास यांना अटक केली. ही कारवाई इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक गणेश पाटील यांच्या सूचनेनुसार निरीक्षक एल. एम. शिंदे, यांनी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आर्थिक वर्षात मद्याचे एकुण ४६ गुन्हे दाखल करुन १५१० लिटर मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये ५० आरोपींना अटक केली आहे. सुमारे २८ लाख ८३ हजार ४२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.