आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३ : १०९ इन्फ्रन्टी बटालियन (टी.ए) मराठा ला.ई.तर्फे कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील लष्करी प्रशिक्षण मैदानावर सुरू असलेल्या प्रादेशिक सेनेत विविध पदांच्या ५४ जागांसाठी सोमवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी ७ हजार ४०० उमेदवारांनी हजेरी लावली. टेबलाईवाडी येथील १०९ इन्फ्रन्टी बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे बटालियन परिसर आणि कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया होत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यामुळे या परिसरात एकच गर्दी झाली. प्रथम सर्व उमेदवारांचे ५० जणांचा एक गट करून त्याची कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर धावण्याची चाचणी घेण्यात आली. त्यामधून पहिल्या टप्पांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी करून त्यांची उंची, वजन, कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानंतर मेडिकल, व लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.दि. ९ एप्रिल पर्यंत ही भरती मेळावा सुरु राहणार आहे. कमांडिग आॅफिसर कर्नल आर. एस. लेहार, कर्नल नविन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होत आहे. यावेळी सुभेदार मेजर बाबु नाईक, सुभेदार राम बरकडे हे मार्गदर्शन करीत आहेत. मैदानी चाचणी आजहीआज, मंगळवारही मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. यामधून पहिल्या टप्प्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची दि.५ ते ७ रोजी मेडिकल केले जाणार आहे. त्यानंतर दि.८ व ९ रोजी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाणार आहे. कॅमेऱ्यांची नजरभरतीची सर्व प्रक्रिया सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नोंद करण्यात येत आहे. कृषी महाविद्यालय मैदानाच्या सभोवतीही कॅमेरे लावले आहेत. भरती प्रक्रिया सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे. पैसे घेणाऱ्यांपासून सावध सेनेत पैसे देऊन भरती होता येत नाही. त्यामुळे पैसे घेणाऱ्यांपासून उमेदवारांनी सावध राहावे. त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. जर कोणी भरतीसाठी पैशांची मागणी केली, तर संबंधित उमेदवारांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील अधिकारी करीत होते. ‘व्हाईट आर्मी’तर्फे मोफत जेवणकोल्हापुरात सुरू असलेल्या सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांना व्हाईट आर्मीतर्फे मोफत जेवण देण्यात आले. सामाजिक बांधीलकी जपत व्हाईट आर्मीतर्फे पुढाकार घेण्यात येत आहे. व्हाईट आर्मीचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रशांत शेंडे, अनिकेत नाईक, विकास चव्हाण, अक्षय चौगले उपस्थित होते.
कोल्हापुरात प्रादेशिक सेनेची भरती सुरु; आज ही होणार मैदानी चाचणी
By admin | Published: April 03, 2017 1:21 PM