कोल्हापूर : कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्यास सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावल्याने मोठा गोंधळ उडला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री बटालियनतर्फे नियोजन केलेल्या भरती मेळाव्यात प्रादेशिक सैन्य भरतीसाठी शिपाई (जनरल ड्युटी), शिपाई क्लार्क, शिपाई (चीफ), शिपाई (स्पेशल चीफ), शिपाई (हाऊसकीपर), शिपाई (हेअर ड्रेसर) या पदांसाठी २ मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या मेळाव्यात १८ ते ४२ वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना भरतीत सहभागी होता येणार आहे.पहाटे तीन वाजल्यापासूनच टेंबलाईवाडी येथील बीएसएनएल चौक येथे गर्दी होऊ लागली. पहिल्या दिवशी फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया होती. मात्र, महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील उमेदवारांनी हजेरी लावल्याने मोठा गोंधळ उडाला. एकाचवेळी दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतल्याने पुढे जाण्यावरून उमेदवारांमध्ये ढकलाढकलीचा प्रकार होऊ लागल्याने गोंधळात अधिकच भर पडली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीहल्ला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.