लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली अनेक महिने रिक्त असलेल्या कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अखेर ए. वाय. गाडे यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर नागरी बँक्स असोसिएशनकडे उपनिबंधक म्हणून कार्यरत असलेले डॉ. महेश कदम यांची विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे येथे बदली झाली आहे. विभागीय सहनिंबधक श्रीकृष्ण वाडेकर यांची अवर सचिव म्हणून बदली झाली आहे.
राज्य शासनाने बुधवारी सहकार विभागातील उपनिंबधक, सहनिबंधकांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक हे पद रिक्त होते. त्या ठिकाणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव ए. वाय. गाडे यांची नियुक्ती करण्यात आली. गेली तीन वर्षे उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) म्हणून कोल्हापुरात कार्यरत असलेले डॉ. महेश कदम यांची पुणे येथे विभागीय उपनिबंधक (दुग्ध)पदी नियुक्ती झाली. सुनील शिरपूरकर यांची उस्मानाबाद येथे बदली झाल्याने गेली महिनाभर हे पद रिक्त होते.
विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांना कोल्हापुरात येऊन दोन वर्षे झाली होती. मात्र त्यांची बदली मुंबई येथे अवर सचिव तथा सहनिबंधक सहकारी संस्था म्हणून झाली आहे. ए. के. चव्हाण यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने हे पद रिक्त होते. मात्र काेल्हापूर विभाग सहनिबंधकपदी अद्याप कोणाची नियुक्ती केलेली नाही.