लोकमत न्यूज नेटवर्क
कोेल्हापूर : घरेलू कामगारांची नोंदणी तातडीने सुरू करून त्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी मागणी सर्व श्रमिक संघाच्यावतीने कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. घरेलू कामगारांची नोंदणी २०१४ पासून थांबली आहे. काहींना मंडळाकडे नोंद होऊनही शासन सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी सहायक कामगार आयुक्तांना नोंदणी पावती करण्याचे आदेश द्यावेत, असेही संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आली. कोरोनाच्या काळात घरेलू कामगारांना साडेसात हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, अशी मागणी संघटनेची होती. मात्र, शासनाने दीड हजार रुपये दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या घरेलू कामगारांनी पूर्वी नोंदणी केली आहे, मात्र त्यांची कागदपत्रे हरवली आहेत. त्यांनाही मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली. या वेळी धोंडिबा कुंभार, नयना सावंत, कविता पाटील, सरिता बेळगी आदी उपस्थित होते.