कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचाही समावेश आहे.या पदासाठी विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या अधिकारी अथवा प्राध्यापकांनी अर्ज करावयाचा असल्यास त्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावी लागते. त्यानुसार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नांदवडेकर, माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह विविध अभ्यासक्रमांच्या एकूण बारा प्राध्यापकांनी एनओसी घेतली आहे. त्यात वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. ए. एम. गुरव, एस. एस. महाजन, रसायनशास्त्र विभागातील डॉ. एस. एस. चव्हाण, आदींचा समावेश आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.
डॉ. नांदवडेकर हे दि. १८ नोव्हेंबर २०१६ पासून कुलसचिव पदावर कार्यरत आहेत. या पदावर रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (एमसीए) संचालक म्हणून कार्यरत होते. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपली आहे. या अर्जाची प्रत (हार्ड कॉपी) जमा करण्याची मुदत शुक्रवार (दि. १०) जुलैपर्यंत आहे. दरम्यान, याबाबत डॉ. नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एनओसी घेतली असून, ऑनलाईन अर्ज केला असल्याचे सांगितले.