कोल्हापूर : पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक आमदार मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकत्रितपणे सुमारे ४२ हजार २०० जणांनी बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत मतदार म्हणून नावनोंदणी केली. नोंदणीचा अंतिम दिवस असल्याने प्रांत कार्यालयात पदवीधर आणि शिक्षकांनी गर्दी केली.या पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक आमदारपदाची निवडणूक जून २०२० मध्ये होणार आहे; त्यासाठी मतदार नोंदणीच्या प्रक्रियेचा बुधवार अखेरचा दिवस होता. या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून मतदार नोंदणीसाठी गेल्या महिन्याभरापासून रस्सीखेच सुरू होती.
अनेक पदवीधर, शिक्षकांनी मतदार नावनोंदणीची प्रक्रिया या इच्छुकांवर अवलंबून न राहता स्वत: पूर्ण केली. नोंदणीचा अखेरचा दिवस असल्याने बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रांत कार्यालयात पदवीधर आणि शिक्षकांनी नोंदणी अर्ज जमा करण्यासाठी रांग लागली होती.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पदवीधरसाठी मतदार नोंदणी ३६ हजार, तर शिक्षक संघासाठी सहा हजार २०० पर्यंत नोंदणी झाली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितले.
३० डिसेंबरला अंतिम मतदारयादीनोंदणीची मुदत संपल्याने आता मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. दि. १९ डिसेंबरला मतदार यादीचे प्रारूप तयार होईल. त्यावर हरकती नोंदविण्याची मुदत दि. ९ डिसेंबरपर्यंत राहील. त्यानंतर अंतिम मतदारयादी दि. ३० डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १ जानेवारी २०२० ते या मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी १0 दिवसांपर्यंत पदवीधर, शिक्षकांना मतदार म्हणून नावनोंदणी करण्याची पुन्हा संधी मिळणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.