कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत योग्य नियोजन करण्यासाठी शहरातील १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांची माहिती संकलन करण्यास महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.
मुलांची माहिती संकलन झाल्यानंतर महापालिकेला तिसरी लाट रोखण्यासाठी व लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून बचाव होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविता येणार आहेत. यातून मुलांची निश्चित अशी संख्या मिळेल. त्यामुळे बालकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती तयारी महापालिकेला करता येईल. यासाठी महापालिकेच्या वतीने गुगलवर https://forms.gle/m4Txi1wdQoA5yE547 या लिंकवर ऑनलाईन फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला आहे. शहरातील पालकांनी आपल्या १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांची माहिती ऑनलाईन भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रातील ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसेच कोविडच्या पहिल्या डोसचे लसीकरण न झालेल्या नागरिकांची माहिती पुढील लसीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेस संकलित करण्यात येत आहे. यासाठी आपल्या घरातील व परिचयातील ६० पेक्षा जास्त वय असलेल्या व पहिल्या डोस न घेतलेल्या नागरिकांची माहिती https://forms.gle/hZfGyT4tRuwGTR3x7 या ऑनलाईन लिंकवर भरावी, असेही आवाहन मोरे यांनी केले आहे.