कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सुरू करण्यासाठी अटी, शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी डी. आर. पाटील यांनी दिली. दस्त नोंदणी करताना दस्तातील लिहून देणार, लिहून घेणार, ओळखदार व साक्षीदार यांचे ४८ तासांचे आतील कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याबाबत अधिकृत पुरावा किंवा कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र दस्ताचा भाग करणे बंधनकारक आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये एकावेळी एका दस्ताची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दस्त नोंदणीकरिता पीडीईद्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात येत आहे. कार्यालयातील डाटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयीन दूरध्वनीवर किंवा समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित केली जाईल. केवळ दस्त सादर करणा-या एका पक्षकारास व वकिलास (असल्यास) कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. विवाह नोंदणीसाठी एकावेळी एकाच विवाहातील दोन पक्षकार व साक्षीदार यांनाच प्रवेश देण्यात येईल. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी लिव्ह ॲण्ड लायसन्स प्रकारचे दस्ताची नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेश होईपर्यंत थांबविण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांना ई-रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध आहे.
नोटीस ऑफ इंटीमेशनचे फिजिकल फायलिंग पुढील आदेश होईपर्यंत थांबवण्यात येत आहे. दस्ताची किंवा सूचीची प्रमाणित प्रत व मूल्यांकन अहवाल यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करणे व फी भरणे थांबवण्यात येत आहे. पक्षकारांनी या कामासाठी अर्ज करणे, फी भरणे व नकलेची उपलब्धता जाणून घेणे यासाठी आपले सरकर वरील सेवेचा वापर करावा.
दृष्टिक्षेपात दस्त नोंदणी
जिल्ह्यातील एकूण कार्यालये : १८
कोल्हापूर शहरात : ०४
सरासरी दैनंदिन दस्त नोंदणी : ३००
प्रतिदिन शासनाला मिळणारा सरासरी महसूल : २५ लाख
व्यवहार असे : खरेदी, तारणगहाण, भाडेपट्टा करार, हक्क सोडपत्र, विवाह नोंदणी आदी