लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जांभळाच्या कुळातील आकर्षक, लाल रंगांची जीवनसत्वांनी भरपूर फळे देणाऱ्या ‘मालाका जाम्ब’ या विदेशी सायसिजीयम या जातीतील दहाव्या प्रजातीची आता कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने नोंद झाली असून, ती वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केली आहे.
कोल्हापुरातील माळी कॉलनी परिसरात एका बंगल्याच्या आवारात आकर्षक, लाल रंगांची फळे देणारा वृक्ष असल्याची माहिती वृक्षप्रेमी अभय कोटणीस यांनी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांना दिली. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, तो फळांनी भरगच्च लगडलेला होता. संदर्भग्रंथ पाहिल्यानंतर हा विदेशी वृक्ष ‘मालाका जाम्ब’ या नावाने भारतात ओळखला जात असल्याचे स्पष्ट झाले. या वृक्षाची कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात प्रथमच रितसर शास्त्रीय पद्धतीने नोंद झाली आहे.
हा वृक्ष जगभरात ‘मलाय ॲपल, मलायम रोझ ॲपल, माऊंटन ॲपल’ अशा नावांनी ओळखला जातो. याचे मूळ स्थान मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया असून, याचे शास्त्रीय नाव ‘सायसिजीयम मालासिएन्सिस’ असे आहे. कोल्हापुरातही या वृक्षाची ही लालचुटूक फळे विक्रीसाठी बाजारात येतात.
असा आहे मालाका जाम्ब...
मालाका जाम्ब हा वृक्ष आठ ते दहा मीटर उंच वाढतो. साल राखाडी, करड्या रंगांची असून, ती भेगाळलेली असते. तसेच पसरलेल्या अनेक फांद्यामुळे त्यांचे गोलाकार छत होते. पाने दहा ते तीस सेंमी लांब, दीर्घवृत्ताकृती, तळाशी अरुंद, चार ते १५ सेंमी रुंद आणि टोकाकडे निमुळती साधी, समोरासमोर, गडद हिरवी, चकचकीत अशी असतात. देठ आखूड तर फुले द्वीलिंगी, किरमिजी, तांबूस लालसर रंगांची असतात. फुले पानांच्या बेचक्यातून किंवा खोडावर आणि जुन्या फांद्यांवर लहान, आखूड गुच्छामध्ये येतात. पुष्पमुकूट चार संयुक्त दलांचं, पाकळ्या चार, सुट्या आणि गडद तांबड्या रंगांच्या, गोलाकार असतात. सुमारे शंभरच्या आसपास पुंकेसर असते तर केसरतंतू तांबूस लालसर असतात. याची फळे मांसल, संदले मागे वळलेली, एक बियांची असतात.
कोट
या वृक्षाची फुले आणि फळे जानेवारी ते मे महिन्यात येतात. फळे रसाळ आणि चवीला साधारण आंबटगोडसर असतात. यापासून सिरप, ज्यूस, साखर व आल्ले घालून जाम बनवतात. यात प्रथिने तसेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अ तसेच क जीवनसत्वे असतात. पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. याच्या बियांपासून सहजरित्या रोपे तयार करता येतात.
- डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती शास्त्रज्ञ.
----------------------------------
फोटो : 15092021-kol-Malaka Jamb Tree/15092021-kol-Malaka Jamb Tree1/
फोटो ओळ : मालाका जाम्ब वृक्ष
फोटो : 15092021-kol-Malaka Jamb flower
फोटो ओळ : मालाका जाम्ब फ्लॉवर
15092021-kol-Malaka Jamb fruits
फोटो ओळ : मालाका जाम्ब फ्लॉवर.
15092021-kol-Malaka Jamb fruits
फोटो ओळ : मालाका जाम्ब फ्रुटस
15092021-kol-Malaka Jamb fruits1
फोटो ओळ : मालाका जाम्ब फ्रुटस १