कागल : पुणे म्हाडाच्यावतीने येथील कागल क. सांगाव रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठीच्या गृहप्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून ४३२ सदनिका तयार केल्या जाणार आहेत. आता पर्यंत ६७० जणांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२१ असून २९ जूनला लाॅटरी पद्धतीने लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. पाच लाखांत वन बीएचके सदनिका मिळणार आहे.
कागल शहरात विविध माध्यमातून घरकुले निर्माण करण्याचे प्रयत्न ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे करीत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात अवघ्या दहा हजारांत दोनशे चाळीस चौरस फूट व नंतरच्या टप्प्यात पन्नास हजारांत अशा एक हजार सदनिका शासकीय योजनेतून नगरपालिकेच्या माध्यमातून कागल शहरात उभारल्या आहेत. आता पुणे म्हाडाच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी हा प्रकल्प उभा करीत आहेत. साडेतीनशे चौरस फूट जागेत वनबीएचके स्वरूपाची ही सदनिका असणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर झालेल्यांची नावे लाॅटरीसाठी घेतली जाणार आहेत.
सदनिका आकार = ३५० चौरस फूट. नोंदणी सोबत भरावयाची रक्कम = ५००० रुपये. सदनिका किंमत=०७ लाख ५० हजार रुपये. आमदारांचा स्थानिक निधी व प्रधानमंत्री आवास योजना अनुदान = ०२ लाख ५० हजार रुपये वजा जाऊन भरावे लागणार ०५ लाख ०१ हजार रुपये.
पुणे म्हाडा आणि कागल
येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची भाजप सरकारच्या काळात पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी म्हाडाचा गृहनिर्माण प्रकल्प कागलमध्ये आणून पायाभरणी समारंभही केला होता. भाजपची सत्ता गेल्यानंतर हा प्रकल्पही थांबला. मंत्री मुश्रीफ यांनी हा प्रकल्प रद्द न करता या जागेच्या जवळच हा दुसरा प्रकल्प सुरू केला .
फोटो
कागल येथे पुणे म्हाडाच्यावतीने अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे.