कोल्हापूर : महारेरा कायद्याअंतर्गत अद्ययावत माहिती न देण्यासह अन्य नियमांचे उल्लंघन केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ बिल्डर्सची नोंदणी ‘महारेरा’ने रद्द केली. ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यामध्ये क्रेडाईचा एकही सदस्य नाही.महारेरा कायद्याने बांधकाम व्यावसायिकांवर अनेक निर्बंध आले आहेत. ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टळली आहे. बांधकाम व्यावसायिकांना ‘महारेरा’कडे नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या निर्माणाधीन असलेल्या प्रोजेक्टची माहिती महारेराच्या वेबसाइटवर प्रत्येक तीन महिन्यांनी बुकिंगबाबतची माहिती, ॲडव्हान्स पेमेंटची माहिती, प्रोजेक्टच्या जाहिरातबाबतची माहिती अद्ययावत करण्याचेही बंधन घालण्यात आले आहे.परंतु काही बांधकाम व्यावसायिकांनी अजूनही महारेराचे नोंदणी प्रमाणपत्र घेतलेले नाही, तसेच माहिती अद्ययावत करत नाही, ज्यांनी नोंदणी प्रमाणपत्र घेतले आहे त्यांनी त्यांची अद्ययावत माहिती महारेराकडे दिली नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आठ बांधकाम व्यावसायिकांची नोंदणी रद्द केली आहे.कारवाई झालेल्यांमध्ये क्रेडाईचा एकही सदस्य नसल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष कृष्णात खोत यांनी सांगितले. ‘महारेरा’चे नोंदणीपत्र घेण्यासाठी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा इथपासून ते अद्ययावत माहिती कशी भरायची याबाबत मार्गदर्शन करण्याचे काम क्रेडाईने हाती घेतले आहे. शिवाय वार्षिक सल्लागार पाहिजे असतील तर तेही देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले.
कारवाई झालेले बांधकाम व्यावसायिकबांधकाम व्यावसायिक / प्रोजेक्टचे नाव
- अतुल विजयकांत मूग / अनंत हेरिटेज
- राजाराम अण्णाप्पा पोळ / आसरा टॉवर
- सुधीर दादू मुळीक / वृंदावन हेरिटेज
- शहाजी गोपाळराव पोवार / १६ इंदू विलास
- श्री भावेश्वरी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स गडहिंग्लज प्रा. लि. / शिव बसव
- साई डेव्हलपर्स / सुभ्रा हाइटस्
- सुहास शिवाजी कुंभार / एस. के. प्लाझा
- व्ही.एस.टी. युनिटी डेव्हलपर्स प्रा. लि. / सरलष्कर हाइटस्