राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करताना कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या निर्णयानुसार एप्रिलपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करण्याचे नियोजन होते. मात्र ह्यकोरोनाह्णचे संकट इतके गडद झाल्याने राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळेही प्रोत्साहनपर अनुदान लटकणार, हे निश्चित असून कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकरी वंचित राहणार आहेत.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सप्टेंबर २०१९ अखेर दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. या शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलपर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होेते.
जानेवारीपासून कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे केली. त्यामुळे युती सरकारच्या काळापेक्षा आघाडी सरकारने राबवलेली कर्जमाफीची योजना वेगाने झाली. अवघ्या साठ दिवसांत कर्जमुक्तीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ३०३ कोटींची कर्जमाफी मिळाली तर दोन लाखांवरील थकबाकीदारांसाठी ह्यओटीएसह्ण योजना लागू केली, त्यातून २२४९ शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाखांचा लाभ मिळाला.
जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकरी कर्जमुक्त झाले. मात्र नियमित परतफेड करणारे शेतकरी अडकले आहेत. सरकारने घोषणा केली असली तरी ह्यकोरोनाह्णच्या संकटाशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा गुंतली आहे. त्यात गेली पावणेदोन महिने लॉकडाऊन सुरू असल्याने राज्याची अर्थव्यवस्था काहीशी खिळखिळीत झाली आहे. राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे म्हटले तर किमान १३०० हजार कोटी लागणार आहेत. आताच्या परिस्थितीत एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकरी हे नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत.
या शेतकऱ्यांची पीक कर्जाची सरासरी उचल आणि त्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान पाहता किमान ६०० कोटी रुपये लागतील. मात्र एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान लटकणार हे आता निश्चित झाले आहे.कर्जमुक्ती : आणखी ३१०० शेतकरी पात्र महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित ३१०० शेतकऱ्यांची नावे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली आहेत. या खात्यांचे लेखापरीक्षण करून त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. महापुरातील उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे मिळणार महापुरातील कर्जमाफी व अतिवृृष्टीतील नुकसानीचे पैसेही लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. संबंधित खात्यांचे लेखापरीक्षण सुरू असून यामध्ये सुमारे २८०० लाभार्थ्यांचा समावेश आहे.