लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील शिवाजी पार्क परिसरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती या नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
आमदार जाधव यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मधील नागरीकांशी संवाद साधत विविध समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतानाच, त्या सोडवण्यासाठी तात्काळ संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन जागेवरच सूचना दिल्या.
शिवाजी पार्क मधील कचरा उठाव नियमीत होत नाही. पाणी पुरवठा कमी दाबाने होतो. भागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून, खडयातून मार्ग काढताना नागरीक व वाहनचालकांची तारांबळ उडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. शिवाजी पार्क मधील जागेचे बी ट्युनर निघाले आहे, मात्र अद्याप प्रोपर्टी कार्ड झाले नसल्याची तक्रार अजित आजरी यांनी केली.
तक्रारी ऐकताच आमदार जाधव यांनी आरोग्याधिकारी जयवंत पवार, जलअभियंता अजित साळोखे, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, शहर भूमापन अधिकारी किरण माने यांना बोलवून घेतले. नागरीकांनी कितीवेळा तुमच्याकडे तक्रारी करायच्या असे थेट सवाल जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना झापले.
आजपासून कचरा उठाव दररोज केला जाईल असे पवार यांनी सांगीतले. अमृत योजनेतून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून नवीन पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर नागरिकांची पाणी पुरवठ्याबाबत तक्रार राहणार नसल्याचे जलअभियंता साळोखे यांनी सांगीतले. रस्त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे पावसाळा संपताच रस्त्याची काम सुरू करणार असल्याचे उपशहर अभियंता घाटगे यांनी सांगितले.
उघड्यावर मद्यपान, कारवाई करा -
खुल्या जागेत काही व्यक्ती मद्यपान करत असून महिलांना सर्वाधिक त्रास होत असल्याची तक्रार महिलांनी केली. तेंव्हा शाहूपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांना बोलवून घेतले. गवळी यांनी उपस्थित नागरिकांना आपला मोबाईल नंबर दिला व मद्यपान करताना कोणी दिसल्यास फोन करा, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे सांगितले.
ॲड. के. ए. कापसे, प्रसाद मंत्री, अजित आजरी, सचिन मालू, रवी तजीनमणी, पियुष पुनातर, राजू लकडे, रमेश गुप्ते, सुशील पोवार, पंकज पोवार, बाबासाहेब महाडिक, शोभा कामत, भूषण पाटील, आनंद काळे, नरेंद्र पायमल उपस्थित होते.
(फोटो आहे स्वतंत्र ओळी देतो)